रिक्षात विसरलेले २ लाख पोलिसांच्या तत्परतेने मिळाले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:11 PM2018-08-19T22:11:06+5:302018-08-19T22:11:35+5:30
बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशाचे रिक्षा विसरलेले २ लाख रुपये असलेली बॅग पोलिसांनी तत्परतेने केलेल्या प्रयत्नांमुळे मिळू शकले़ .
पुणे : बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशाचे रिक्षा विसरलेले २ लाख रुपये असलेली बॅग पोलिसांनी तत्परतेने केलेल्या प्रयत्नांमुळे मिळू शकले़ .
याबाबतची माहिती अशी, प्रशांत दत्तात्रय तेली (वय २८, रा़ कडलास, ता़ सांगोला, जि़ सोलापूर) हे शनिवारी दुपारी ४ वाजता आपल्या मित्राबरोबर रिक्षाने अल्पना टॉकीज येथून भवानी पेठेत गेले होते़ त्यांनी रिक्षाच्या सीटच्या मागे २ लाख रुपये व लहान ड्रील मशीन असलेली बॅग ठेवली़ भवानी पेठेत उतरल्यानंतर त्यांनी रिक्षामध्ये ठेवलेली कटर मशीन घेतली़ पण मागे ठेवलेली बॅग घेण्याचे विसरले़.
काही वेळाने त्यांच्या ही बाब लक्षात आली़. त्यांनी रामोशी गेट पोलीस चौकीत येऊन ही माहिती दिली़. पोलीस नाईक एस़ एम़ खाडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व सहायक निरीक्षक जे़ सी़ मुजावर यांना कळवून रिक्षाचा शोध घेतला़. भवानी पेठेतील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ती रिक्षा गणेश पेठेतील सय्यद जाफर सैयद अली यांची असल्याचे समजले़. त्यांच्या घरी गेल्यावर ती रिक्षा संदीप कांबळे हे चालवत असल्याचे त्यांनी सांगितले़.
त्यानुसार ते कांबळे यांच्या घरी गेले, तेव्हा कांबळे हे नुकतेच घरी येत होते़. त्यांना बॅगेविषयी विचारल्यावर त्यानी माहिती नसल्याचे सांगितले़. त्यानंतर त्यांनी रिक्षात पाहिल्यावर सीटच्या मागच्या बाजूला ती बॅग तशीच असल्याचे आढळून आले़. बॅगेत ड्रिल मशीन व २ लाख रुपये तसेच होते़. त्यानंतर ती बॅग प्रशांत तेली यांना परत करण्यात आली़ प्रवाशाला बॅग मिळवून देण्याची कामगिरी सचिन खाडे, महावीर दावणे, संदीप कांबळे यांनी केली़ .