धक्कादायक! धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; पीडितेला रस्त्यावर टाकून आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 07:50 AM2021-08-19T07:50:43+5:302021-08-19T07:51:02+5:30
काम देण्याच्या बहाण्यानं बोलावून कारमध्ये बलात्कार; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी
दिल्ली: ईशान्य दिल्लीतल्या शास्त्री पार्क परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नोकरी देण्याच्या बहाण्यानं आरोपी पीडितेला कारमधून दिल्लीला घेऊन आले होते. त्यानंतर राजधानी दिल्लीतल्या रस्त्यावर धावत्या कारमध्ये आरोपींनी तरुणीवर बलात्कार केला. तरुणीनं विरोध करताच आरोपींनी तरुणीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
सामूहिक बलात्कार करून आरोपींनी तरुणीला रस्त्यात सोडून दिलं आणि ते तिथून फरार झाले. पीडितेनं महिला हेल्पलाईनकडे मदत मागितली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. टेक्निकल सर्विलान्सच्या मदतीनं पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांकडे आरोपींच्या कारचा नंबरदेखील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना (२२ वर्षे) (नाव बदलण्यात आलेले आहे) तिच्या पतीसोबत ६ महिन्यांपासून गाझियाबादमध्ये भाड्यानं राहत आहे. तिचा पती ट्रक चालक आहे. तो सध्या मध्य प्रदेशात काम करत आहे. तर कल्पना मोलकरीण म्हणून काम करते. ती दुसऱ्या कामाच्या शोधात असताना काही दिवसांपूर्वी तिला एका अज्ञात नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्यानं स्वत:चं नाव रोहित सांगितलं आणि नोकरीबद्दल विचारणा केली.
माझ्या भावाचं दिल्लीत कपड्याचं दुकान असून तिथे तुला नोकरी देतो, असं आरोपीनं कल्पनाला सांगितलं. चांगला पगारदेखील मिळेल. असं आश्वासनही दिलं. पीडितेनं आधी नकार दिला. मग मात्र ती तयार झाली. १६ ऑगस्टला पीडितेनं रोहितला कॉल केला. त्यानंतर रोहित आणि तिची भेट झाली. रोहित कार घेऊन आला होता. कारमध्ये आणखी एक तरुण होता. तो कार चालवत होता. तो आपला मित्र असल्याचं रोहितनं सांगितलं.
आरोपी कल्पनाला कारनं गाझियाबादवरून दिल्लीला घेऊन आला. कार दिल्लीच्या रस्त्यावर धावत असताना आरोपीनं पीडितेवर बलात्कार केला. विरोध करताच त्यानं पीडितेला बेदम मारहाण केली. त्यानंतर शास्त्री पार्क परिसरात कार थांबवण्यात आली. तिथे दुसऱ्या तरुणानंदेखील पीडितेवर बलात्कार केला. या घटनेबद्दल वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांनी पीडितेला दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या मदतीनं तपास सुरू आहे.