मुंब्य्रातील तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 05:47 AM2019-12-20T05:47:26+5:302019-12-20T05:47:29+5:30
रमजान महिना असल्याने तक्रारदार मुनाफ शेख याने मुंब्य्रातील अमृतनगर बसस्टॉपजवळील फुटपाथवर लेडिज चप्पल विकण्याचा धंदा लावला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रस्त्यावर दुकान लावण्यावरून मुंब्य्रातील अम्माद उर्फ अम्मू शेख (२१) याची सुरा भोसकून केलेल्या हत्येप्रकरणी मुंब्य्रातील अमीर सलीम शेख आणि कामरान अलीम शेख या दोघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.वाय. जाधव यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला असून, त्यापैकी ९० हजार रुपये हे मृताच्या पत्नीस देण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. या खटल्याचा एक साक्षीदार हा साक्ष देण्यासाठी दुबई येथून आला होता.
रमजान महिना असल्याने तक्रारदार मुनाफ शेख याने मुंब्य्रातील अमृतनगर बसस्टॉपजवळील फुटपाथवर लेडिज चप्पल विकण्याचा धंदा लावला होता. दरम्यान, या प्रकरणातील एक अल्पवयीन आरोपी त्या ठिकाणी आला होता. त्यावेळी अम्मू शेख आणि इम्रान नेपाळी हे दोघेही तिथेच धंदा करत होते. अल्पवयीन आरोपीने मुझे इस जगह पर धंदा लगाने का है, असे म्हणून अम्मूशी वाद घातला.
त्यामुळे अम्मूने त्याला दोघे मिळून अर्ध्याअर्ध्या जागेत धंदा लावा, असे सांगितले. त्यानुसार, दुसऱ्या दिवशी अल्पवयीन आरोपी तेथे आला आणि मुझे धंदा लगाने के लिए पुरी जगह चाहिए, असे म्हणून रागाने निघून गेला. त्याच रागातून अल्पवयीन आरोपी अमीर शेख, कामरान शेख आणि तारीक अशा चौघांनी अम्मूची २० जुलै २०१३ रोजी सुºयाने भोसकून हत्या केली.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.आर. नगरकर यांनी अल्पवयीन आरोपीसह जन्मठेप सुनावलेल्या दोघांना पकडले होते. त्यातील अल्पवयीन आरोपीची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात केली गेली. उर्वरित दोघांविरोधात ठाणे न्यायालयात सुनावणी सुरू झाली. न्यायाधीश जाधव यांच्या न्यायालयासमोर सरकारी वकील संजय मोरे यांनी सात साक्षीदार तपासले.
युक्तिवाद व पुरावे ग्राह्यमानून न्यायालयाने दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी सहा महिने कैदेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दंडातील ९० हजार मृताच्या पत्नीला आणि १० हजार रुपये सरकारजमा करण्याबाबत म्हटले आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी तारीक हा घटनेच्या दिवसापासून फरार आहे.