दोन अल्पवयीन मुलींची बलात्कारानंतर हत्या; २०१० मधील घटनेची आता कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:00 AM2018-10-16T06:00:24+5:302018-10-16T06:00:51+5:30
पॉक्सोच्या अठरा गुन्ह्यांत अटकेत असलेल्या रेहान कुरेशीने २०१० मध्ये दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.
- सूर्यकांत वाघमारे।
नवी मुंबई : पॉक्सोच्या अठरा गुन्ह्यांत अटकेत असलेल्या रेहान कुरेशीने २०१० मध्ये दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. हे दोन्ही गुन्हे मुंबईच्या नेहरूनगर परिसरातील आहेत. बलात्कार केल्यानंतर त्यांच्याकडून घटनेची वाच्यता होऊ नये याकरिता त्याने हे कृत्य केले आहे.
कुर्ला येथील नेहरूनगर परिसरात २०१० मध्ये घडलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. रेहान कुरेशीने या दोनही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मुलींवर बलात्कार केल्यानंतर आपले बिंग फुटू नये याकरिता त्याने गळा आवळून त्यांची हत्या करून निर्जन स्थळी मृतदेह टाकले होते. सलग तीन महिन्यांच्या कालावधीत असे चार गुन्हे घडल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. त्यापैकी एक गुन्हा त्याचवेळी उघडकीस आल्याने संबंधिताला अटक झाली होती. मात्र उर्वरित गुन्हे उघडकीस आले नव्हते. अखेर आठ वर्षांनी हे गुन्हे उघडकीस आले आहेत.
त्या वेळी रेहान कुरेशी (३४) हा चुनाभट्टी परिसरात राहायला होता. त्याच परिसरात ८- १० वर्षांच्या मुलींना वासनेचे बळी पाडले होते. तेव्हा परंतु या मुलींकडून घरी वाच्यता होण्याच्या भीतीने त्याने बलात्कारानंतर त्यांची हत्या केली होती. पॉक्सोच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी आजवर उघड न झालेल्या पॉक्सोच्या गुन्ह्यांचा नव्याने तपास सुरू केला होता. त्यानुसार नेहरूनगरच्याही गुन्ह्यांची चौकशी पोलीस करत होते. त्याकरिता रेहानचे नमुने डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रेहानने चौकशीत त्याने बलात्कार व हत्येच्या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. घरातून बाहेर निघताना तो सतत गुन्ह्याच्या तयारीत असायचा. याकरिता तो अंतवस्त्रही घालत नव्हता, असे चौकशीत समोर आले.
मुंबईसह, ठाणे, पालघर व नवी मुंबई परिसरात रेहानवर पॉक्सोचे गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपासून या घटना घडूनही त्याच्याविषयी माहिती हाती लागत नव्हती. अखेर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मीरा रोड परिसरातून त्याला पकडले. सध्या तो नेरुळमधील गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात आहे.
सोसायटीतून कुटुंबाची हकालपट्टी
नवी मुंबई पोलीस मागावर असल्याची चाहूल लागल्याने रेहानचे कुटुंब मीरा रोडला वूडलँड सोसायटीत भाड्याने राहायला गेले होते. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाअंती त्याला अटक केल्यानंतर सोसायटीला त्याच्या कृत्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोसायटीने त्यांचे घर खाली केले आहे.