दोन अल्पवयीन मुलींची बलात्कार करून हत्या; आत्महत्या भासवण्यासाठी झाडाला लटकवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 07:52 AM2022-09-16T07:52:02+5:302022-09-16T07:52:13+5:30
या प्रकरणी भरपाई व न्यायाची मागणी करत मुलींच्या कुटुंबीयांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे.
लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) : येथे दोन दलित अल्पवयीन बहिणींवर नराधमांनी बलात्कार करून नंतर हत्या करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील निघासन भागात बुधवारी ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी येथे दिली. घटनेमुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली असून, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी भरपाई व न्यायाची मागणी करत मुलींच्या कुटुंबीयांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. राज्य शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आश्वासन पीडित कुटुंबाला दिल्याचे सांगण्यात येते. जुनैद आणि सोहेलची या दोन बहिणींशी मैत्री होती. हे दोघे शेजारच्या लालपूर गावचे रहिवासी आहेत. या दोघी बुधवारी दुपारी त्यांच्यासोबत घराबाहेर पडल्या होत्या, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
आईने सांगितला घटनाक्रम
आपल्या मुलींची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची तक्रार मुलींच्या आईने बुधवारी रात्री निघासन कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. शेजारी राहणारा छोटू व अन्य काही युवक दुचाकीवरून माझ्या झोपडीत आले व त्यांनी मुलींचे अपहरण केले. मी विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यातील एकाने मला लाथ मारली आणि ते मुलींना दुचाकीवरून गावाबाहेरील शेताकडे घेऊन गेले, असा आरोप त्यांनी केला. गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील झाडाला या मुलींचे लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह नंतर आम्हाला आढळून आले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीकडून पिस्तूल व गोळ्या जप्त
आरोपी जुनैद हा लपून बसला होता. पोलीस आज सकाळी पकडण्यासाठी आल्यानंतर त्याने पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत तो जखमी झाला, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले. जुनैदकडून गावठी पिस्तूल व गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
‘त्या’ घटनेची आठवण
ही घटना २०१४ मधील बदायू सामूहिक बलात्कारासारखी आहे. बदायूत १४ आणि १५ वर्षांच्या दोन दलित मुलींची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला लटकवले होते.