गुंडाच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक, 4 आरोपींचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 09:48 PM2021-06-05T21:48:10+5:302021-06-05T21:48:44+5:30
तडीपार गुंड अशोक सरदार (रा. जेवडनगर) याच्या डोक्यात मोठा दगड घालून शुक्रवारी त्यांनी ही निर्घृण हत्या केली. गुन्हेगारी वर्चस्वाच्या लढाईत ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले
अमरावती : अशोक सरदार हत्याकांडात राजापेठ पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. या प्रकरणात अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायालयाने ८ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. अनिल चंपतराव डोळे (३६) आणि प्रतीक प्रकाश कांबळे (२५, दोन्ही रा. जेवडनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात शुक्रवारी अतुल सुभाष तुपाळे (३२) व राजेश अशोक थोरात (३५, दोन्ही रा. जेवडनगर) यांना अटक करण्यात आली होती.
तडीपार गुंड अशोक सरदार (रा. जेवडनगर) याच्या डोक्यात मोठा दगड घालून शुक्रवारी त्यांनी ही निर्घृण हत्या केली. गुन्हेगारी वर्चस्वाच्या लढाईत ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. शुक्रवारी रात्री मृत अशोकच्या पत्नीने राजापेठ ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविली. या खूनप्रकरणात आणखी दोघे सहभागी असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते. त्यावरून पोलिसांनी अनिल व प्रतीक यांना रात्री अटक केली. पुढील तपास राजापेठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे करीत आहेत.
अशोक सरदार तीन वेळा तडीपार
हत्या झालेला गुंड अशोक सरदार याच्याविरुद्ध विविध ठाण्यांच्या हद्दीत २० पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे राजापेठ पोलिसांनी सांगितले. मुख्य आरोपी अतुल तुपाळे, राजेश थोरात व मृतक अशोक सरदार यांनी पाच वर्षांपूर्वी एका जणावर चाकुहल्ला चढविला होता. या गुन्ह्यात भादंविचे कलम ३२४ अन्वये तिन्ही आरोपी सोबत होते, असे पोलीस तपासात पुढे आले आहे.