नगर अर्बन बॅंक फसवूणक प्रकरणी आणखी दोघे जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 22:01 IST2021-03-08T22:00:30+5:302021-03-08T22:01:18+5:30
Crime News : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक

नगर अर्बन बॅंक फसवूणक प्रकरणी आणखी दोघे जाळ्यात
पिंपरी : नगर अर्बन को-ऑप बॅंकेच्या २२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी आणखी दोघांना सोमवारी (दि. ८) अटक करण्यात आली. या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आत्तापर्यंत एकूण चार आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींच्याही मागावर पोलीस आहेत.
आशुतोष सतीश लांडगे (वय ३८, रा. अहमदनगर), जयदीप प्रकाश वानखेडे (वय ३४, रा. पुणे, मूळ रा. श्रीरामपूर ), असे सोमवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी नवनीत शांतीलाल सूरपुरिया (वय ५५, रा. अहमदनगर) आणि यज्ञेश बबन चव्हाण (वय २५, रा. संभाजीनगर, चिंचवड) या दोघांना अटक केली होती. याप्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (वय ५६, रा. अहमदनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली आहे. बॅंकेच्या चिंचवड येथील शाखेत २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजुदेवी हरिमोहन प्रसाद (सर्व रा. चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी), अभिजित नाथा घुले (रा. अहमदनगर), यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य, तसेच नगर अर्बन को-ऑप बॅंकेचे संचालक सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. नेश लिब टेक्नोरिअल व मे. इंडियन इंजिनियरिंग इंडस्ट्रिज पुणे या फर्मचे कर्जदार आरोपी यांनी आपसात संगनमत करून स्वत:च्या फायद्यासाठी कर्जप्रकरण केले. त्यासाठी तारण गहाण मिळकतीचा बनावट मूल्यांकन अहवाल दिला. कर्ज उपसमिती सदस्य व बॅंकेच्या संचालक सदस्यांनी तो अहवाल स्वीकारून बॅंकेची २२ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात येत आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक नियुक्त केले आहे, असे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले.