सराफाच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक, मास्टरमाइंडसह दोघांना सुरत येथे जंगलात पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 12:03 PM2021-07-05T12:03:59+5:302021-07-05T12:05:02+5:30
लूट आणि हत्येची ही घटना ३० जून रोजी घडली होती. पाटीदार हा घटनेच्या २५ दिवस आधी मुंबईत आला आणि रेकी करून मारेकऱ्यांना सर्व योजना समजावून तो मुंबईतून परत गेला होता. तर त्याचा साथीदार प्रमोद लखरिया याने या सर्वांना शस्त्र पुरविले.
मुंबई : दहिसरच्या ज्वेलर्समध्ये घुसून शैलेंद्र पांडे (४६) या सराफाची हत्या करण्यात आली होती. दुकानात शिरल्यानंतर थेट गोळी घालून लूट करा असे सांगून शूटर्सना पाठविणाऱ्या बंटी पाटीदार (२३) याच्यासह त्याचा साथीदार प्रमोद लखरिया (२२) याला रविवारी दहिसर पोलिसांनी सुरतच्या पिठमपूर जंगलातून अटक केली आहे.
लूट आणि हत्येची ही घटना ३० जून रोजी घडली होती. पाटीदार हा घटनेच्या २५ दिवस आधी मुंबईत आला आणि रेकी करून मारेकऱ्यांना सर्व योजना समजावून तो मुंबईतून परत गेला होता. तर त्याचा साथीदार प्रमोद लखरिया याने या सर्वांना शस्त्र पुरविले. तसेच गोळीबार कसा करायचा, दरोडा कसा घालायचा, ‘टार्गेट’पर्यंत कसे पोहोचायचे याचे प्रशिक्षण दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. हे दोघे सुरतमधील पिठमपूर जंगलात लपल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि दहिसरचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, ओम तोतावार, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, अभिनय पवार आणि पथकाने सापळा रचत दोघांना पकडले.
आतापर्यंत एकूण सातजण जेरबंद
पाटीदारच्याच इशाऱ्यावरून लूट आणि पांडेंची हत्या करणाऱ्या आयुष पांडे (१९), निखिल चांडाल (२१), उदय बाली (२१) चिराग रावल (२१) आणि अंकित महाडिक (२१) या पाच जणांना यापूर्वीच सुरत जवळून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणातील अटक आरोपींची एकूण संख्या ७ झाली आहे.