आठ लाखांचे बक्षीस असणारे दोन नक्षलवादी चकमकीत ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:00 PM2021-04-28T20:00:05+5:302021-04-28T20:02:04+5:30
Naxalist killed in encounter : दोघांवर अनेक गुन्ह्यांची नोंद, शस्त्रांसह स्फोटक साहित्य जप्त
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभागात येणाऱ्या गट्टा (जांभिया) पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात बुधवारी सकाळी उडालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. त्यांची ओळख पटली असून, दोघांवर मिळून ८ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. चकमकीनंतर परिसरात घेतलेल्या शोधमोहिमेत एक ९ एमएम पिस्टल, भरमार बंदूक, स्फोटक साहित्य आणि नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापरातील साहित्य पोलिसांच्या हाती लागले.
पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सायंकाळी या घटनेची सविस्तर माहिती दिली. नक्षलविरोधी अभियान राबविणारे सी-६० पथकाचे जवान सकाळी ६.३० ते ७ वाजेदरम्यान गस्तीवर असताना जंगलात दबा धरून बसलेल्या २० ते २५ नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलीस जवानांनीही गोळीबार केला. यानंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्या परिसरात शोधमोहीम सुरू असताना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. त्यांची ओळख पटविल्यानंतर अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
अनेक गुन्ह्यांमध्ये होता सहभाग
पोलिसांच्या गोळीने वेध घेतलेल्या दोघांपैकी विवेक ऊर्फ सुरज ऊर्फ मनोहर कानू नरोटे (रा. झाडाटोला, ता. धानोरा) हा भामरागड दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. त्याच्यावर खून, चकमक, हत्येचा प्रयत्न असे १८ गुन्हे दाखल होते. २०२० मध्ये कोठी येथे शहीद झालेले जवान दुशांत नंदेश्वर यांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते. विनय लालू नरोटे (रा. झारेवाडा, ता. एटापल्ली) हा गट्टा दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावरही खून, जाळपोळ, चकमक, हत्येचा प्रयत्न असे १६ गुन्हे दाखल होते.