गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण; दोघांवर मिळून ६ लाखांचे होते बक्षीस

By मनोज ताजने | Published: September 21, 2022 02:20 PM2022-09-21T14:20:03+5:302022-09-21T14:22:49+5:30

विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाचे यश

Two Naxals with six lakh reward Surrenders Before Gadchiroli Police | गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण; दोघांवर मिळून ६ लाखांचे होते बक्षीस

गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण; दोघांवर मिळून ६ लाखांचे होते बक्षीस

Next

गडचिरोली : नक्षल्यांकडून बुधवार दि.२८ पासून पाळल्या जात असलेल्या विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर दोन नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. त्यातील अनिल उर्फ रामसाय जगदेव कुजूर (२६ वर्ष) याच्यावर ४ लाखांचे तर रोशनी उर्फ ईरपे नरंगो पल्लो (३० वर्ष) हिच्यावर २ लाखांचे ईनाम शासनाने ठेवले होते. हे दोघेही सध्या आपापल्या घरी राहून नक्षल चळवळीसाठी काम करत होते.

अनिल हा एटापल्ली तालुक्यातील रा. तिम्मा जवेली येथील रहिवासी असून रोशनी ही छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील डांडीमरका या गावातील रहिवासी आहे. नक्षल चळवळीपासून दूर जाऊन शांततेने जीवन जगण्यासाठी त्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. चळवळीत महिलांना दुय्यम वागणुकीसह अनेक बाबतीत डावलले जाते. वरिष्ठ माओवाद्यांकडून महिलांना लग्नासाठी बळजबरी केली जाते, अशा अनेक कारणांमुळे आपण आत्मसमर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता या दोघांनाही केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

दलममधील सहभाग आणि गुन्हे
    
अनिल कुजूर : डिसेंबर २००९ मध्ये कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन मे २०१० पर्यंत तिथे कार्यरत होता. मे २०१० ते २०१२ पर्यंत कसनसूर दलममध्ये कार्यरत होता. त्यानंतर २०१२ ते २०२२ या दरम्यान घरी राहूनच नक्षल दलमने सांगितलेले कामे करत होता. यादरम्यान तो २०११ मधील खोब्रामेंढा ॲम्बुशमध्ये सहभागी होता. त्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद तर ५ जवान जखमी झाले होते. तसेच निहायकल ते ग्यारापत्ती रोडवरील ॲम्बुशमध्ये सीआरपीएफचे ५ जवान जखमी झाले होते. २०११ मधील छोटा झेलिया जंगलातील चकमकीतही तो सहभागी होता.

रोशनी पल्लो : सन २००९ मध्ये छत्तीसगडमधील जटपूर दलममध्ये ती सदस्य पदावर भरती झाली. काही दिवसातच तिला झोन टेक्निकल दलममध्ये पाठविण्यात आले. २०१५ ते २०१८ पर्यंत एसीएम व उपकमांडर पदावरही ती कार्यरत होती. त्यानंतर जुलै २०१८ पासून ती घरी राहून दलमचे काम करत होती. तिचा सन २०१५ मध्ये मौजा कुंदला (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक, मौजा गुंडूरपारा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक आणि २०१७ मध्ये मौजा दुरवडा (छ.ग.) येथील गोटूलमध्ये व जंगल परिसरात झालेल्या दोन चकमकींमध्ये सहभाग होता. २०१५ मध्ये भामरागड तालुक्यातील मौजा इरपनार गावातील ३ लोकांच्या खुनाचा तिच्यावर आरोप आहे.

Web Title: Two Naxals with six lakh reward Surrenders Before Gadchiroli Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.