सांगलीत कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक
By शीतल पाटील | Published: November 8, 2022 07:56 PM2022-11-08T19:56:51+5:302022-11-08T19:57:32+5:30
शहर पोलिसांची कारवाई; दुचाकी, कोयता जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: स्टेशन चौक परिसरात तोंडाला रुमाल बांधून कोयता घेवून थांबलेल्या दोघांना सांगली शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून विना नंबरप्लेट दुचाकीसह कोयता जप्त करण्यात आला.
वैभव बाळासाहेब नांदणीकर (वय ३१ रा. बामणोली, कुपवाड ) आणि सैफन बादशहा तेरदाळ (वय ३२ रा. बनहट्टी, जि. बागलकोट, सध्या रा. कुपवाड ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढविली आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांना स्टेशन चौकातील एसएफसी मॉलच्या मागील बाजूस दोघेजण थांबले असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता तोंडाला रुमाल बांधलेले दोघेजण तेथे थांबल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडउडवीची उत्तरे दिली. तसेच त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता वैभव नांदणीकर याच्या कमरेला कोयता मिळून आला. नांदणीकरच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचा गुन्हा यापूर्वी दाखल असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. संशयीत आरोपीच्या ताब्यातून विना नंबरप्लेटची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस नाईक विजय कारंडे अधिक तपास करीत आहेत.