हितेश मुलचंदानी खूनप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 07:05 PM2019-07-25T19:05:19+5:302019-07-25T19:06:28+5:30
हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला.
पिंपरी : हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला होता . याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना गुरुवारी (दि. २५) न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवार, दि. ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यापूर्वी पिंपरी पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले होते.अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (वय २५, रा. शितोळेनगर, सांगवी) व योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (वय २०, रा. पिंपळे गुरव) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. शाहबाज सिराज कुरेशी (रा. कासरवाडी) आणि आरबाज शेख (रा. खडकी) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी रोहीत किशोर सुखेजा (वय २६, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील दोन आरोपी औंध येथील स्पायसर कॉलेज रोडवर येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. २४) रात्री पोलिसांनी स्पायसर कॉलेज रोड परिसरात सापळा रचून लिंगा आणि लंगडा यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली मोटार देखील त्यांच्याकडून जप्त केली. लिंगा आणि लंगडा दोघेही सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील शाहबाज आणि आरबाज हे दोघेजण अद्याप फरार आहेत.
पिंपरी कॅम्पात कँडलमार्च
हितेश मुलचंदानी याच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी कॅम्पात बुधवारी (दि. २४) सायंकाळनंतर शगुन चौक ते बाबा छत्तुरामलाल मंदिर दरम्यान कँडलमार्च काढण्यात आला. यात व्यापारी, व्यावसायिक, महिला व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पिंपरी परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, पथारीवाले, हॉटेल, आइस्क्रीम पार्लर यासह अन्य दुकानेही रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. ही सर्व दुकाने वेळेत बंद करण्यात यावीत, अशी मागणी सिंधी समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.