३ लाखांची लाच घेणारे दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 09:36 PM2019-02-27T21:36:37+5:302019-02-27T21:39:03+5:30
पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर (32) आणि पोलिस उपनिरीक्षक नजीव नजीर इनामदार (38) अशी अटक पोलिसांची नावे आहेत.
ठाणे - अटक न करण्यासाठी 3 लाखांची लाच स्विकारणार्या दोन पोलीस उपनिरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. एकाच वेळी आणि एकाच प्रकरणात सहभाग असलेल्या 2 पोलीस उपनिरीक्षकांना 3 लाख रूपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर (32) आणि पोलिस उपनिरीक्षक नजीव नजीर इनामदार (38) अशी अटक पोलिसांची नावे आहेत.
ते दोघेही पालघर जिल्हयातील बोईसर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयात अटक न केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार हे तक्रारदारास 3 लाखाची लाच मागत होते. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने 12, 14 आणि 21 फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. लाचेची रक्कम देताना दीड लाख रूपयाच्या खर्या नोटा तर दीड लाख रूपयाच्या डमी नोटा वापरण्यात आल्या. पोलीस उपनिरीक्षक पासलकर आणि इनामदार यांनी लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.