३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात दोन पोलीस दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 07:24 AM2022-08-15T07:24:01+5:302022-08-15T07:24:19+5:30
मध्य प्रदेश पोलिसांनी साहिब सिंह, दलबीर सिंह व बलविंदर सिंह या तिघांना अटक केल्यानंतर अमृतसर जिल्ह्यातील मेहता पोलीस ठाण्याकडे सुपुर्द केले होते.
- बलवंत तक्षक
चंडीगड : बनावट चकमकीच्या ३० वर्षे जुन्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सेवानिवृत्त झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना दोषी धरले आहे. हत्या व पुरावे नष्ट करण्याच्या अनेक गुन्ह्यांखाली दोन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना १६ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
दोषी अधिकाऱ्यांमध्ये अमृतसर जिल्ह्यातील मेहता पोलीस ठाण्यातील अतिरिक्त एसएचओ किशन सिंह व उपनिरीक्षक तरसेम लाल यांचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपी एसएचओ राजिंदर सिंह यांचा सुनावणीच्या कालावधीत मृत्यू झालेला आहे. दोषींना न्यायालयाने जेलमध्ये पाठवले आहे.
१९९२ चे हे प्रकरण आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी साहिब सिंह, दलबीर सिंह व बलविंदर सिंह या तिघांना अटक केल्यानंतर अमृतसर जिल्ह्यातील मेहता पोलीस ठाण्याकडे सुपुर्द केले होते. त्यांची चौकशी करण्यात आली व या कालावधीत तिघांबरोबर अन्य एकाला ठार करण्यात आले. पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबीयांना माहिती न देताच अंत्यसंस्कारही केले होते.