तुमची औकात दाखवतो म्हणत २ पोलिसांनी रोखली थेट न्यायाधीशांवर बंदूक, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 05:23 PM2021-11-19T17:23:51+5:302021-11-19T17:24:11+5:30
काही दिवसांपूर्वी विधिक सेवा समितीच्या समक्ष घोघरडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोलीरही गावात राहणाऱ्या महिलेने पोलीस निरीक्षकाविरोधात बनावट गुन्हा नोंद केल्याचं निवेदन दिले होते
मधुबनी – लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर त्यांचे ४ खांब मजबूत असण्याची गरज आहे. त्यात न्यायव्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. मात्र बिहारमध्ये घडलेल्या एका घटनेला लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम केले आहे. तुमची काय लायकी आहे ते आज दाखवतो, तु आमच्या बॉस एसपीला त्रास दिलाय. बॉसच्या आदेशावर तुझी औकात दाखवतो हे शब्द आहेत त्या पोलिसवाल्यांचे. ज्यांच्यावर न्याय व्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आहे.
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर न्यायालयाच्या विधिक सेवा समितीचे अध्यक्ष ADJ अविनाश कुमार यांच्या चेंबरमध्ये घुसून पोलीस अधिकारी गोपाल कृष्ण आणि SI अभिमन्यु शर्मा यांनी बंदूक रोखत धमकी दिली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांनी न्यायाधीशांवर बंदूक रोखण्याची हिंमत केली असेल. ADJ अविनाश कुमार हे त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांनी चांगलेच चर्चेत असतात. एका प्रकरणात न्यायाधीश अविनाश कुमार यांनी एका धोब्याला गावातील सर्व महिलांचे कपडे धुण्याची शिक्षा सुनावली होती. तर एकदा एका शिक्षकाला पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना मोफत शिकवण्याचा आदेश दिला होता. तर अलीकडेच त्यांनी मधुबनी येथील पोलीस अधीक्षक डॉ. सत्यप्रकाश यांना कायदा शिकवावा असं पत्र केंद्र सरकारला दिले होते. त्यावरुन दोन पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायाधीशावरच बंदूक रोखत त्यांना धमकी दिली.
काय आहे वाद?
काही दिवसांपूर्वी विधिक सेवा समितीच्या समक्ष घोघरडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोलीरही गावात राहणाऱ्या महिलेने पोलीस निरीक्षकाविरोधात बनावट गुन्हा नोंद केल्याचं निवेदन दिले होते. ज्यावरुन कोर्टाने बुधवारी घोघरडीहा ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना समन्स बजावलं. परंतु त्यादिवशी पोलीस अधिकारी कोर्टासमोर हजर झाले नाहीत. गुरुवारी ते पोलीस कोर्टासमोर हजर झाले तेव्हा त्यांनी ADJ अविनाश कुमार यांच्यासोबत वाद घातला. त्यावेळी वाद इतका वाढला की पोलिसांनी थेट न्यायाधीशांवरच बंदूक रोखली.
यावेळी न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना पकडलं. या गोंधळात न्यायाधीशांना किरकोळ दुखापत झाली. तेव्हा न्यायालयात उपस्थित असणाऱ्या काही वकिलांनी आरोपी पोलिसांना बेदम मारलं. त्यानंतर हे प्रकरण दरभंगाचे IG अजिताभ चौधरी, मधुबनी DM अमित कुमार आणि SP डॉ. सत्यप्रकाश यांच्याकडे गेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना उपचारासाठी हॉस्पिटलला नेले. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य न्यायाधीशांनी प्रधान सचिव आणि DGP यांना बोलवलं. २९ नोव्हेंबरला सरकार आणि मधुबनी एसपी डॉ. सत्यप्रकाश यांच्याकडे स्पष्टीकरण मागवण्यात आले. ८ तासांच्या हायवॉल्टेज ड्रामानंतर पोलिसांकडून केवळ या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं विधान आले. तपासानंतर कारवाई होईल असं सांगितले. मात्र या घटनेनंतर झंझारपूर बार असोसिएशननं निषेध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.