पोलिसांना लाच देणारे दोन रेती तस्कर एसीबीच्या जाळ्यात; भंडारामधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 10:18 PM2021-10-13T22:18:12+5:302021-10-13T22:18:19+5:30
लाखांन्यायालयात सकारात्मक बयाणासाठी तीन हजाराचे आमिष
लाखांदूर (भंडारा) : रेती तस्करी प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेला ट्रॅक्टर सुपूर्दनाम्यावर सोडण्यासाठी न्यायालयात सकारात्मक बयाण नोंदविण्यासाठी एका पोलिसाला तीन हजार रुपये लाच देणे, दोन रेती तस्करांना महागात पडले. भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाखांदूर येथे सापळा रचून पोलिसाला लाच देणाऱ्या दोन रेती तस्करांना जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
ट्रॅक्टर मालक नंदकिशोर नामदेव ठाकरे (२८), निवास दशरथ ठाकरे (४२) दोन्ही रा. आथली ता. लाखांदूर अशी लाच देणाऱ्यांची नावे आहेत. २ ऑक्टोबर रोजी आथली येथील सरपंचांनी आथली नदी घाटातून अवैधरीत्या रेती चोरी प्रकरणी लाखांदूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी या नंदकिशोर व निवास यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला होता.
जप्त असलेला ट्रॅक्टर सुपूर्दनाम्यावर सोडण्यासाठी तपासी पोलिस कर्मचाऱ्याला दोघांकडून लाचेचे आमिष देण्यात आले. मात्र त्या पोलिसाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून बुधवारी सापळा रचण्यात आला. लाखांदूरमधील एका बारमध्ये तीन हजार रुपये लाच देताना दोघांना रंगेहात पकडले.
लाच घेताना विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र लाच देणाऱ्यांना अटक करण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच कारवाई असावी. ही कारवाई भंडारा एसीबीचे उपविभागीय पोलिस अधिकारी महेश चाटे, पोलिस निरीक्षक सोनटक्के, पोलीस नाईक अतुल मेश्राम, कोमल बनकर, पोलीस अंमलदार चेतन पोटे, धार्मिक आदींनी केली. वृत्त लिहिस्तोवर लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.