बिरवाडीत चोऱ्यांचे सत्र सुरूच, एकाच रात्री दोन दुकाने, नऊ फ्लॅट फोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 02:38 AM2019-08-17T02:38:32+5:302019-08-17T02:38:49+5:30
महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ कायम असून शुक्रवार, १६ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दोन दुकाने, नऊ सदनिका फोडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरल्याची घटना उघड झाली आहे.
बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ कायम असून शुक्रवार, १६ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दोन दुकाने, नऊ सदनिका फोडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरल्याची घटना उघड झाली आहे.
बिरवाडी जुनी बाजारपेठ येथील सागवेकर ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानामधून चोरट्यांनी शटर तोडून एक लाख रुपये किमतीची चांदी, ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या वस्तू, असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरल्याची माहिती ज्वेलर्स मालक संदीप सागवेकर यांनी दिली आहे. बिरवाडी बापटनगर येथील शारदा कॉम्प्लेक्स, साईकृपा कॉम्प्लेक्स, श्री जय जय रघुवीर समर्थ कृपा कॉम्प्लेक्स, राजकमल बिल्डिंग, रमेश मालुसरे यांचा बंगला या ठिकाणांचा समावेश आहे.
एकूण नऊ बंद सदनिका चोरट्यांच्या टोळीने फोडल्या असून, बिरवाडी मच्छीमार्केट येथील श्लोक सुपरमार्केट दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाले आहेत. कौस्तुभ धारिया यांच्या मालकीच्या श्लोक सुपरमार्केटच्या दुकानातील संगणकाची चोरट्यांनी मोडतोड केली आहे, या ठिकाणी फार मोठी रोख रक्कम चोरट्यांना मिळालेली नाही.
वारंवार होणाºया चोरीच्या घटनांमुळे येथील नागरिक व व्यापारी रोख रक्कम, सोन्याचे दागिने हे घरात न ठेवता बँक लॉकरमध्ये ठेवत असल्याने बंद सदनिकांमध्ये चोरट्यांना काही हाती न लागल्याने केवळ सामानाची नासधूस करून पळ काढला. खरवली येथील राजहंस सोसायटीमधूनमोटारसायकल चोरी करून ती चोरीच्या घटनांमध्ये वापरल्याचे सीसीटी कॅमेºयात निदर्शनास आले आहे.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी घरफोडीच्या घटनेनंतर तक्रारी दाखल करून घेण्याचे काम सुरू असून, ठसे तपासणी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. चोरीच्या घटनाक्रमावरून चोरट्यांची टोळी ही परप्रांतीय असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीही चोरट्यांनी बाजारपेठेमधील बंद दुकाने सदनिकांना लक्ष्य केले होते. मात्र, पोलीस व्हॅनवरील चालक शिंगणकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मधाळे यांनी दाखविलेल्या धाडसामुळे चोरट्यांच्या टोळीतील साथीदारांना मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. धुमाकूळ घालणारी चोरांची टोळी ही मध्यप्रदेशातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, चोरीच्या ठिकाणी दगड, लॉक आढळून आले आहेत.
पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी
बंद पोलीस चौकी सुरू करण्याची नागरिकांची मागणी गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असल्याने पोलीस चौकी तत्काळ सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. अपुरे पोलीस कर्मचारी यामुळे या ठिकाणी काम करताना गुन्ह्याच्या तपासाचा मोठा ताण पोलीस कर्मचारी यांच्यावर असल्याची बाबही समोर आली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये ५५ कर्मचारी मंजूर असून, ३० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत आणि २० पदे रिक्त आहेत.