नालासोपाऱ्यात विजेचा शॉक लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 02:45 AM2018-11-08T02:45:06+5:302018-11-08T02:45:27+5:30
बिलालपाडा येथे घराजवळ खेळत असलेल्या दोन चिमुकल्या भावांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. चोरट्या वीजेचा प्रवाह शिडीत उतरल्याने ही दुर्घटना घडली.
नालासोपारा - बिलालपाडा येथे घराजवळ खेळत असलेल्या दोन चिमुकल्या भावांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. चोरट्या वीजेचा प्रवाह शिडीत उतरल्याने ही दुर्घटना घडली.
हंसराज यादव चाळीत कैलास यादव हे पत्नी आणि तीन मुलांसह राहतात. सकाळी पियुष यादव आणि आयुष यादव हे घराबाहेर खेळत होते. जवळच एका बेकायेशीर चाळीचे काम सुरू होते. त्यांनी बेकायदेशीर वीज जोडणी घेतली होती. त्याचा विद्युत प्रवाह लोखंडी शिडीत उतरला होता. खेळताना आयुष याचा लोखंडी शिडीला हात लागला आणि तो खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी आलेला पियुष पुढे सरसावला आणि त्यालाही विजेचा धक्का लागला. दोन्ही भावांना वसई विरार महापलिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
नालासोपारामध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. बिलालपाडा येथीही आजूबाजूच्या परिसरात बसविण्यात आलेल्या विद्युत वाहक एका खांबाला मोठ्यासंख्येने विद्युत वाहक तारा जोडलेल्या असून त्यातून आजूबाजूच्या घरांना वीज जोÞडण्या देण्यात आल्या आहेत. परंतु वीज जोडण्या देत असताना विद्युत वाहक तारांचा विस्तार घरापर्यंत योग्य रित्या न केल्याने या तारा इमारती, झोपड्या, टेरेस, चाळी त्यावर त्यांचा गुंता तयार झाला आहे. काही ठिकाणी प्रवाहित तारा लोंबकळत असल्याने त्यातून विद्युत प्रवाह इतर बाबीत उतरत असतो. महावितरण अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची वीज जोडणी दिलेली नव्हती. बेकायदा पद्धतीने वीज चोरी केली जात होती. त्याबाबत आम्ही कारवाई देखील करीत असतो. या परिसरातील वीज चोरींची पाहणी करून कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.