दोन शिक्षकांनीच व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून फोडला बारावीचा पेपर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 06:05 AM2023-03-06T06:05:50+5:302023-03-06T06:06:23+5:30
दाेन शिक्षण संस्था चालकांसह सात आराेपींना अटक
मुंबई/साखरखेर्डा (जि. बुलढाणा) : दोन शिक्षकांनीच व्हाॅट् सॲप ग्रुप तयार करून त्याद्वारे बारावीचा गणिताचा पेपर व्हायरल केल्याचे पोलिस तपासात समोर आले असून याप्रकरणी दाेन शिक्षण संस्थाचालकांसह ५ आराेपींना शनिवारी रात्री अटक केली आहे. त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. रविवारी रात्री आणखी दाेन शिक्षकांना अटक केली. शे. अकील शे. मुनाफ (रा. लोणार), अंकुश पृथ्वीराज चव्हाण (सावरगाव तेली) अशी त्यांची नावे आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यात ३ मार्च राेजी इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर समाजमाध्यमावर व्हायरल झाला हाेता. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेडराजा पाेलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण साखरखेर्डा पाेलिसांकडे वर्ग केले आहे. साखरखेर्डा पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत पाच जणांना ४ मार्च राेजी ताब्यात घेतले हाेते.
पेपरफुटीमध्ये प्रत्यक्ष सहभाग आढळल्याने गजानन शेषराव आडे, गाेपाल दामाेधर शिंगणे, गणेश बद्रीनाथ पालवे, पवन सुधाकर नागरे, गणेश शिवानंद नागरे यांना रात्री उशिरा पाेलिसांनी अटक केले हाेते.
नगरमधून एक जण ताब्यात
- बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊण तास आधी दादरमधील एका परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना मोबाइलवर मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी नगरमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
- याबाबत त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा दावा राज्य मंडळाने केला आहे. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा वाजून १७ मिनिटांनी त्याला प्रश्नपत्रिकेचा काही भाग मिळाल्याचे मोबाइल पाहणी करता उघड झाले होते.
...असा फाेडला पेपर
- किनगावजट्टू येथील वसंतराव नाईक इंग्लिश स्कूलचे संचालक गजानन शेषराव आडे यांच्या शाळेतील विद्यार्थी हे वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय बीबी येथे परीक्षा देत आहेत.
- ३ मार्चला पेपर सुरू होण्यापूर्वी त्यांनी गणिताचा पेपर १०:३०ला मोबाइलवरून व्हायरल केला.
- त्याच मोबाइलवरून त्या प्रश्नांची उत्तरे १०:४५ ला अनेक विद्यार्थ्यांना मिळाली. गजानन आडे यांच्या मोबाइलवरून गणेश शिवाजी नागरे, पवन सुधाकर नागरे, गणेश बद्रीनाथ पालवे (तिघेही रा. भंडारी, ता. सिंदखेडराजा) यांना पेपर मिळाला. आराेपी गोपाल दामोदर शिंगणेची शेंदुर्जन येथे शिक्षण संस्था आहे.