गुन्हा करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन अट्टल चोरट्यांना पकडले, खामगाव शहर पोलिसांची कारवाई
By अनिल गवई | Published: August 24, 2023 04:31 PM2023-08-24T16:31:15+5:302023-08-24T16:34:24+5:30
आरोपींकडून दोन चाकू, मिरचीपूड आणि रोख ७०० रुपये जप्त करण्यात आले.
खामगाव: डोळ्यात मिरचीपूड टाकून गुन्हा करण्याच्या उद्देशाने खामगावात फिरत असलेल्या दोन अट्टल चोरट्यांना खामगाव पोलीसांनी बुधवारी रात्री पकडले. दोन्ही आरोपीकडून चाकू, मिरचीपूडसह रोख जप्त करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पो.कॉ. गणेश कोल्हे यांनी शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, खामगाव शहरातील विकमसी चौकात दोघे संयशास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर आरोपींची विचारपूस करण्यात आली. या आरोपींबाबत संशय बळावल्यामुळे दोघांचीही अंग झडती घेण्यात आली. त्यावेळी आरोपींकडून दोन चाकू, मिरचीपूड आणि रोख ७०० रुपये जप्त करण्यात आले.
विनोद शंकर गिरे ४५, रा. दर्यापूर आणि शेख अरबाज शेख अमिन ५९ रा. अमरावती अशी आरोपींची नावे असल्याचेही तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीसांनी उपरोक्त आरोपींविरोधात भादंवि कलम ४०१ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.
दोघांविरोधात विविध गुन्हे दाखल
खामगाव शहर पोलीसांनी पकडलेल्या दोन्ही आरोपी िवरोधात वर्धा, अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात िविवध गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात उघड झाली. तसेच आरोपींकडे चोरीची दुचाकी आढळून आला. मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशानेच हे आरोपी फिरत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.