भंगारात दुचाकी विकणारे दोन चोर गजाआड
By सचिन राऊत | Published: February 6, 2024 11:46 PM2024-02-06T23:46:40+5:302024-02-06T23:48:07+5:30
अकोला : अकोट फाईल परिसरातील विविध ठिकाणावरून दोन वेगवेगळे जागेवरून दुचाकी चोरी झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे ...
अकोला : अकोट फाईल परिसरातील विविध ठिकाणावरून दोन वेगवेगळे जागेवरून दुचाकी चोरी झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गठीत करण्यात आले. या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या दुचाकीचे भंगार व इलेक्ट्रिक बॅटरी असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अकोट फैलातील हाजी नगर येथील रहिवासी फिर्यादी जुबेर अहमद मोहम्मद युनूस व मोहम्मद न्यास अहमद या दोघांच्या दुचाकी आकाेट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्या होत्या. त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व तपास सुरू केला. मात्र चोरट्यांचा शोध लागत नसल्याने पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात एक पथक नियुक्त केले.
या पथकाने संशयावरून शेख आबिद शेख जैनुद्दीन वय ४८ वर्षे राहणार भारत नगर अकोट फैल यास ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदार शेख कबीर शेख रफिक वय ४४ वर्षे राहणार भारत नगर अकोट फाइल याच्या मदतीने दोन्ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर या दुचाकी भंगारात विक्री केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी २८ हजार रुपये किमतीचे भंगार व १२ हजार रुपये किमतीच्या चार इलेक्ट्रिक बॅटरी असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही चोरट्यांना पुढील तपासासाठी अकोट फाईल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, रवींद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, विशाल मोरे, वसीमुद्दीन शेख, अविनाश पाचपोर, एजाज अहमद, भीमराव दिपके यांनी केली.