'त्या' दोन शाळकरी मुलींचे अपहरण झाले नव्हते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 08:59 PM2019-06-28T20:59:58+5:302019-06-28T21:39:26+5:30
या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.
मीरारोड - अंधेरी रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीसांना सापडलेल्या भाईंदर पूर्वेच्या एका शाळेतील चौथीत शिकणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थींनींचेअपहरण झाले नव्हते असे नवघर पोलीसांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन त्या स्वत:च गेल्या होत्या असे आढळून आले आहे. परंतु या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.
मंगळवारी रात्री अंधेरी रेल्वे स्थानकावर दोन लहान शाळकरी गणवेशातील मुली रेल्वे पोलिसांना दिसून आल्याने त्यांनी त्वरीत दोघींची विचारपूस केली. त्यावेळी त्या मुलींनी शाळेतुन सुटल्यावर बाहेर एका अनोळखी इसमाने तुम्हाला तुमच्या आई कडे घेऊन जातो सांगुन रिक्षात बसवले. तसेच आई अंधेरी रेल्वे स्थानकात थांबली आहे सांगुन लोकलच्या महिलांच्या डब्यात बसवले असे सांगीतले होते. रेल्वे पोलीसांनी नवघर पोलीसांशी संपर्क साधून घडला प्रकार सांगितला. मुलींना पालकांच्या स्वाधीन केल्यावर पोलीसांना अपहरणाचा प्रकार म्हणून तपास सुरु केला. शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विद्यार्थ्यांच्या घोळक्यात या दोघी मुली देखील शाळेतून सायंकाळी बाहेर पडल्या. सीसीटीव्हीमध्ये एकीचे वडील दुचाकी घेउन शाळेबाहेर वाट बघत थांबले होते ते पण दिसून आले. तेथून त्यांनी मुख्य रस्त्यावर जाऊन रिक्षा पकडली. रिक्षा पकडून त्या भाईंदर रेल्वे स्थानकात गेल्या. स्वत: मुलींनी तिकीट काढून फलाटावर पोहचल्या. फलाटावर काही वेळ होत्या. नंतर त्यांनी लोकल पकडली.
हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये आला असून त्यांच्यासोबत कोणी अनोळखी इसम वगैरे आढळून आला नसल्याचे नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगितले. परंतु पोलीसांचा तपास सुरु असून अपहरणाचे पुरावे अजून आढळलेले नाहीत. अपहरण झाले नाही तर मग या दोघी मुली अंधेरीला गेल्या कशाला ? याचे उत्तर मात्र अजून सापडलेले नाही.