एसटी स्टँडमधील सुलभ शौचालय चालकाचा गळा आवळून, डोकं आपटून खून; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:32 PM2021-08-20T12:32:38+5:302021-08-20T12:32:54+5:30
शिरवळ बस स्थानकातील सुलभ शौचालय चालकाचा खून; पोलिसांकडून तपास सुरू
शिरवळ: खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एसटी स्टँड बसस्थानकातील सुलभ शौचालयात सुलभ शौचालय चालकाचा गळा आवळून डोके आपटत खून करण्यात आला आहे. रणजित गणपतराव जाधव (वय ४०, रा.बौध्द आळी ,शिरवळ ता.खंडाळा) असे खून झालेल्या सुलभ शौचालय चालकाचे नाव आहे.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शिरवळ ता. खंडाळा येथील रणजित जाधव यांनी एसटी स्टँडमध्ये असणाऱ्या सुलभ शौचालय चालविण्याकरीता घेतले आहे. दरम्यान, दि.१९ रोजी नेहमीप्रमाणे रणजित जाधव हा सुलभ शौचालय याठिकाणी उपस्थित असताना त्याठिकाणी अज्ञात दोघांबरोबर काही कारणावरुन रणजित जाधव यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. अज्ञात दोघांनी रणजित जाधव यांचा गळा आवळत डोके आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस येताच शिरवळ परिसरात खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली.
यावेळी घटनास्थळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सागर अरगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी सातारा येथील रिओ श्वानाला व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी एका संशयिताला शिरवळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास शिरवळ पोलीस करीत आहे.