महाडमध्ये दोन ह्यवासुदेवह्ण गजाआड!, जादूटोणा करण्याच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 01:23 AM2021-02-14T01:23:28+5:302021-02-14T01:23:52+5:30
crime news : जादूटोणा करून आम्ही ही करणी दूर करतो, असे सांगत त्यांनी या महिलेकडून तीन हजार रुपये उकळले.
महाड : करणी दूर करण्यासाठी जादूटोणा करण्याच्या बहाण्याने एका वृद्ध महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन वासुदेवांना महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४३ हजार ७०५
रुपयांची रोख रक्कमही जप्त
करण्यात आली आहे. महाड शहरात अनेकांना या दोघांनी पाचशे रुपयांपासून पन्नास हजार रुपयांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.
लखन गौड ( वय ३५, रा. जळोची, ता. बारामती ) आणि ज्ञानेश्वर गंगवने ( मेळद ता. बारामती ) अशी या दोन भामट्यांची नावे आहेत. वासुदेवाचा वेश परिधान करून ते भिक्षा मागण्याच्या निमित्ताने प्रभात कॉलनी परिसरातील एका वृद्ध महिलेच्या घरात गेले. तेथे भविष्य सांगण्याचा बहाणा करीत तुझ्यावर करणी करण्यात आली आहे, असे त्यांनी या महिलेला सांगितले. जादूटोणा करून आम्ही ही करणी दूर करतो, असे सांगत त्यांनी या महिलेकडून तीन हजार रुपये उकळले. तर या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका साक्षिदाराकडूनही सहाशे रुपये तर दुसऱ्याकडूनही काही रक्कम उकळली.
हा प्रकार या महिलेचा जावई दीपक पवार याला समजल्यानंतर त्याने फसवणुकीची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी महाड बाजारपेठेतून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक व्ही.व्ही. शिंदे करीत आहेत. या दोघांनी शहरात अनेकांची फसवणूक केली आहे. शहरातील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.