उलवेतून सराईत दुचाकी चोरट्यास अटक; चोरीच्या अकरा मोटरसायकल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 02:54 PM2019-03-07T14:54:00+5:302019-03-07T14:56:50+5:30
गुन्हे शाखेची कामगिरी
नवी मुंबई - गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उलवेतून सराईत वाहनचोराला अटक केली आहे. चौकशीत त्याच्याकडून चोरीच्या अकरा मोटरसायकल जप्त केल्या आहेत. त्याच्याकडून इतरही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
वाढते वाहनचोरीचे गुन्हे नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेकडून सराईत वाहनचोरांचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान एका सराईत वाहनचोराची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांनी सहायक निरीक्षक निलेश माने, विजय चव्हाण, उपनिरीक्षक योगेश वाघमारे, सहायक उपनिरीक्षक शेखर तायडे, मनोहर चव्हाण, हवालदार अनिल कदम, सतीश भोसले आदींचे पथक तयार केले होते. त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार उलवे परिसरात पाळत ठेवली होती. यावेळी दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या नदीम युसूफ शेख याला अटक केली. तो उलवे सेक्टर ३६ चा राहणार आहे. चौकशीत त्याने ११ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नेरूळमधील ९, वाशीतील १ व मुंबईची १ मोटारसायकल आहे. खंडणी विरोधी पथकाकडून त्याची अधिक चौकशी सुरु असून त्याने केलेले इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.