सांगलीत दहा घरफोड्यांसह दुचाकी चोरीचा छडा,लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

By शीतल पाटील | Published: January 23, 2023 09:32 PM2023-01-23T21:32:47+5:302023-01-23T21:33:28+5:30

एलसीबीची कारवाई : दागिन्यांसह १३ दुचाकीही जप्त, संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील

Two-wheeler theft spree with 10 house burglaries in Sangli, lesson learned by police | सांगलीत दहा घरफोड्यांसह दुचाकी चोरीचा छडा,लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

सांगलीत दहा घरफोड्यांसह दुचाकी चोरीचा छडा,लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

googlenewsNext

सांगली : घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १० घरफोड्यांसह १३ दुचाकी गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला. चोरट्यांकडून दुचाकी, दागिन्यांसह १३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तौफिक सिकंदर जमादार (वय २९, रा. उमळवाड चर्चजवळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर अधीक्षक आँचल दलाल यांनी घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश एलसीबीला दिले होते. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी त्यासाठी पथक नियुक्त केले. सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या नेतृत्वाखालील पथक शहरात गस्तीवर होते. अंकली फाटा परिसरात एक संशयिताकडे विनाक्रमांकाची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. पथकाने तौफिक जामदार याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील दुचाकीच्या कागदपत्रांची माहिती मागितली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या सॅकमध्ये चांदीच्या मूर्ती व इतर मुद्देमाल मिळून आला. चौकशी केली असता त्यांच्यावर महात्मा गांधी पोलिस चौकीत घरफोडीचा तर कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले. एलसीबीने तौफिकला अटक केली. त्याने कुंभोज, शिरोळ, निमशिरगाव, औरवाड, हरिपूर, विश्रामबाग येथे दुचाकी चोरल्याची कबुली दिली. शामरावनगर मधील साई कॉलनी व उमळवाड येथे चोरीतील दुचाकी ठेवल्याची माहिती त्याने दिली. पथकाने दोन्ही ठिकाणहून साडेसहा लाखांच्या १३ दुचाकी जप्त केल्या.

चौकशी दरम्यान पोळ मळा, मिरजेतील ख्वॉजा वस्ती, शामरावनगर, मिरजेतील साई कॉलनी, विद्यानगर, शंभरफुटी रस्ता, सांगली बसस्थानक, शाहू उद्यान परिसर, गारपीर परिसरातील घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, तांब्याची भांडी असा सात लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईत विनायक सुतार, ऋतुराज होळकर, दीपक गायकवाड, नागेश खरात, हेमंत ओमासे, सुनील लोखंडे, कुबेर खोत, चेतन महाजन, संदीप नलवडे, सुनील जाधव, मेघराज रूपनर, नीलेश कदम यांचा सहभाग होता.

संशयित रेकॉर्ड वरील गुन्हेगार

संशयित तौफिक सिकंदर जमादार रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर सांगलीसह संकेश्वर, विजयपूर येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Two-wheeler theft spree with 10 house burglaries in Sangli, lesson learned by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.