पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ दुचाकीस्वाराला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 10:47 AM2021-03-16T10:47:00+5:302021-03-16T10:47:29+5:30
शहरात खळबळ : कोयत्याने मारहाण करून रोकड असलेली बॅग पळवली
पिंपरी : शहरात जबरी चोरीचे गुन्हे वाढतच असून चिंचवड येथे पोलीस आयुक्तालया जवळील रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला कोयत्याने मारहाण करून तिघांनी लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शैलसिंह मोहनसिंग (वय २९, रा. वाल्हेकरवाडी रोड, पंचरत्न कॉलनी, चिंचवड) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि. १५) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी दुचाकीस्वार आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शहरातील औषध मेडिकल दुकानांवर जाऊन औषध विक्रेत्यांच्या मागणीनुसार मालाची नोंदणी करून त्याची रक्कम संकलित करतात. फिर्यादी हे रविवारी (दि. १४) नेहमीप्रमाणे त्यांचे दिवसभराचे काम संपवून रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान चिंचवड येथे प्रेमलोक पार्क ते बिजलीनगर पाणवठ्याजवळून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी रस्त्यातील गतिरोधक त्यांनी त्यांच्या दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे फिर्यादी दुचाकीवरून खाली पडले. आरोपींनी कोयत्याने मारहाण केली. त्याला फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी दुखापत करून फिर्यादीकडील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. २५० रुपये किमतीचे बॅग, त्यात ते ३३ हजार रुपयांची रोख रक्कम, सात हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ४० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. चिंचवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल तपास करीत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर लुटमारीचा हा प्रकार घडला. पोलीस आयुक्तालयात जवळील या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी वेगात तपास सुरू केला आहे. त्यानुसार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी करण्यात आली. घटनास्थळ परिसरातील एका कॅमेऱ्याचे फुटेज हे कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) आहेत. तसेच मुख्य रस्त्यावरील का कॅमेर्यामध्ये तीन जण एका दुचाकीवरून जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र रात्रीची वेळ असल्याने दुचाकीचा क्रमांक व दुचाकीस्वारांची चेहरे स्पष्ट होत नसल्याने आणखी सीसीटीवी फुटेज तपासण्यात येणार आहेत.