अडीच लाखांची लाच मागणारे दोघे जेरबंद; बिअर बार प्रस्तावासाठी मागणी
By राजेश शेगोकार | Published: May 23, 2023 03:43 PM2023-05-23T15:43:00+5:302023-05-23T15:43:18+5:30
एसीबीची कारवाई: बियर बार चा प्रस्ताव मंजुरीसाठी मागितली होती पाच लाखांची लाच
राजेश शेगाेकार
अकोला: अकोट येथे बिअर बार सुरू करण्या साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दुय्यम निरीक्षकासह जवानाने पाच लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार व त्यांच्यात झालेल्या तडजोडीनंतर दोन लाख साठ हजार रुपये देण्याचे ठरले. एसीबीच्या पडताळणी त दोघांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांनाही मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या वडिलांनी २०१४ मध्ये अकोट येथे राज दरबार नावाने बियर बार सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविला होता. परंतु या प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने तक्रारदाराच्या वडिलांनी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोला कार्यालयातील विशाल रमेशराव बांबलकर वय वर्ष ३६ राहणार चेतना नगर मोठी उमरी व दुय्यम निरीक्षक संजय पांडुरंग कुठे वय वर्ष ५३ राहणार बाबूजी बडगुजर कॉलनी जुने धुळे यांनी बिअर बारचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदारास एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्यामुळे त्यांच्या तळजळ होऊन ही रक्कम दोन लाख ६० हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाच मागणाऱ्या दोघांना मंगळवारी दुपारी अटक केली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.