२१ एटीएम फोडणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 11:46 AM2023-04-06T11:46:20+5:302023-04-06T11:47:05+5:30
पत्रा तोडून पळताना केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बोरीवली पश्चिम परिसरात असलेल्या बासिन कॅथलिक को ऑपरेटिव्ह बँकेत दोन अनोळखी व्यक्तींनी स्क्रू ड्रायव्हरने एटीएम मनी डिस्पेंस पट्टी तोडून त्यातील रोख चोरण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बँकेच्या सहायक व्यवस्थापकांनी एमएचबी कॉलनी पोलिसात तक्रार दिल्यावर धीरेंद्रकुमार रामदेव पाल आणि अभिषेक रामअजोर यादव यांना बुधवारी अटक केली. त्यांनी आतापर्यंत २१ एटीएम फोडल्याची कबुली दिली आहे. पोलिसांना पाहून घराचा पत्रा तोडून ते पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या मुसक्या आवळल्या.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन शिंदे , सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पवार, हवालदार शिंदे, खोत, नाईक देवकर, शिपाई सवळी शेरमाळे, मोरे आणि परिमंडळ ११ च्या शिपाई रुपाली डाईंगडे यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी चोरी करून उत्तर प्रदेशच्या प्रतापगडला जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार त्यांच्यावर लक्ष ठेवल्यावर ठाण्याच्या जय भीमनगरमध्ये पत्र्याच्या झोपडीत ते लपल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पवार यांच्या पथकाने त्यांच्या झोपडीस चारही बाजूने घेरले. ते पाहून आरोपीने घराचा पत्रा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या मुसक्या आवळण्यात पवार यांच्या पथकाला यश आले. त्यांनी एमएचबी कॉलनीसह टिळक नगर, तुळींज, मीरा- भाईंदर, नालासोपारा, चेंबूर, डोंबिवली या ठिकाणी मिळून २१ एटीएम फोडल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
नेमकी घटना काय?
तक्रारदार जय फरगोज (३०) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी संध्याकाळी त्यांच्या बोरीवली शाखेतील एटीएम सेंटरचा सुरक्षारक्षक सुभाष कुमार मातो याने एटीएममध्ये येणाऱ्या ग्राहकांना व्यवहार होण्यात अडथळा येत असल्याचे कळविले. त्यामुळे मशीनची देखभाल करणारे मंदार सावंत यांना बोलाविल्यावर मशीनमधील पट्टा कोणीतरी तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.