पोपटाची तस्करी करणारी दुकली वनविभागाच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 03:57 PM2020-10-31T15:57:58+5:302020-10-31T15:59:04+5:30
विविध प्रकारचे 88 पोपट केले जप्त
ठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातून पोपटाची तस्करी करण्यासाठी आलेल्या दुकलीला ठाणे वन विभागाने ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून तीन पोपट जप्त असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या दोघांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी छापे टाकून विविध जातीचे 88 पोपट जप्त केले असल्याची माहिती ठाणे वन विभागाच्यावतीने देण्यात आली.
ठाण्यातीळ पाचपाखाडी विवियाना मॉल शेजारी वन्य प्राण्यांची तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती ठाणे वन विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे उप वनसंरक्षक गिरीजा देसाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेद्र मुठे व वनपाल संजय पवार वनपाल दतात्रय पवार, हेमंत कारंडे यांच्या पथकाने विवियाना मॉल, ज्युपिटर हॉस्पिटल येथे सापळा रचून पक्ष्यांची तस्करी करण्यासाठी आलेल्या दुकलीला ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून तीन पोपट जप्त करण्यात आले.
या प्रकानी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या दोघांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी छापे टाकले असता, विविध जातीचे तब्बल 88 पोपट आढळून आले. आढळून आलेले सर्व पोपट जप्त करण्यात आली असल्याची माहिती ठाणे वन विभागाने दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे करीत आहेत.