सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलाल महिलांना अटक; अल्पवयीन मुलीसह दोन पिडितांची सुटका
By जितेंद्र कालेकर | Published: April 21, 2023 06:37 PM2023-04-21T18:37:57+5:302023-04-21T18:38:16+5:30
ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: महातमा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गरिब असहाय मुलींना फूस लावून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करणाºया दोन दलाल महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कल्याणमधून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी शुक्रवारी दिली. एका अल्पवयीन मुलीसह दोन पिडित मुलींची त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.
ठाणे परिसरात पिडित असहाय्य मुलींना फूस लावून शरीरविक्रयासाठी पाठविले जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रिती चव्हाण, जमादार डी. जे. भोसले, डी. व्ही. चव्हाण, डी. के. वालगुडे आणि हवालदार पी.ए. दिवाळे आदीच्या पथकाने २० एप्रिल रोजी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ अनिल पॅलेस नंबर एक या हॉटेलमध्ये बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला.
याच कारवाईमध्ये दोन दलाल महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीसह अन्य एका महिलेची सुटका करण्यात आली. दोन आरोपी महिलांविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे सरक्षण अधिनियम (पोक्सो) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.