अणुभट्टी साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू; श्वास गुदमरला; वाडा येथील कारखान्यात दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 12:00 PM2022-12-15T12:00:19+5:302022-12-15T12:00:29+5:30

कंपनी प्रशासनाकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही साधनसामग्री नसल्याने या कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप

Two workers die while cleaning reactor; suffocated; Factory accident at Wada | अणुभट्टी साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू; श्वास गुदमरला; वाडा येथील कारखान्यात दुर्घटना

अणुभट्टी साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू; श्वास गुदमरला; वाडा येथील कारखान्यात दुर्घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाडा (पालघर) : वाडा तालुक्यातील बिलोशी या गावच्या हद्दीत असलेल्या महिंद्रा रोझीन अँड टर्पेंटाईन या कारखान्यातील अणुभट्टीची साफसफाई करण्यासाठी टाकीमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, कामगारांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांना नकार दिल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. 

सचिन बाळकृष्ण भोईर (रा. बिलोशी, वाडा) व सचिन यशवंत करले (रा. गोऱ्हे, वाडा) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुण कामगारांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिलोशी गावाच्या हद्दीत महिंद्रा रोझीन अँड टर्पेंटाईन हा रासायनिक कारखाना आहे. त्यात अणुभट्टी असून, ती साफ करण्यासाठी मंगळवारी रात्री एक कामगार उतरला होता. आतील रसायनाच्या वासामुळे तो गुदमरल्याने आरडाओरडा करू लागला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार भट्टीमध्ये उतरल्याने तोही गुदमरल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण
कंपनी प्रशासनाकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही साधनसामग्री नसल्याने या कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे सांगून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कंपनी व्यवस्थापनाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. हा अपघात कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाल्याने कामगारांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

भरपाईची मागणी       
दरम्यान, वाडा तहसीलदार कार्यालयात कंपनीचे मालक व मृतांचे नातेवाईक यांच्यात चर्चा सुरू असून, कंपनी मालक चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यास तयार असल्याचे समजते. मात्र, नातेवाईकांनी प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

मनुष्यवधाचा 
गुन्हा नोंदवा  
या दुर्घटनेप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वाडा पोलिस अधिक तपास करत आहेत. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याने मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केली आहे.

Web Title: Two workers die while cleaning reactor; suffocated; Factory accident at Wada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.