दोन वर्षांच्या मुलाचा पाण्यात बुडवून खून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 12:40 AM2018-11-06T00:40:49+5:302018-11-06T00:41:24+5:30
पत्नी नांदण्यास येत नसल्याने चिडून पोटच्या दोन वर्षांच्या मुलाचा उजनीच्या पाण्यात बुडवून खून केल्याची घटना रविवारी (दि. ४) सकाळी कुंभारगाव येथे घडली.
भिगवण - पत्नी नांदण्यास येत नसल्याने चिडून पोटच्या दोन वर्षांच्या मुलाचा उजनीच्या पाण्यात बुडवून खून केल्याची घटना रविवारी (दि. ४) सकाळी कुंभारगाव येथे घडली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खुनशी पित्याने चिमुकल्याचा निर्घृण खून केल्याने कुंभारगावात नागरिक हळहळ व्यक्त करीत होते.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे ठाणेअंमलदार अनिल सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोमल शिवाजी धुमाळ (वय २०, रा. कुंभारगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कोमल आणि शिवाजी धुमाळ यांचा विवाह २०१५मध्ये झाला होता. तसेच त्यांना ऋतेश हा दोन वर्षांचा मुलगा होता. कोमल पतीशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून मुलाला घेऊन माहेरी राहत होती.
या दोघांचे घटस्फोट प्रकरण न्यायालयात आहे. काही दिवसांपासून शिवाजी हा पत्नीस माहेरी राहण्यास येण्यासाठी त्रास देत होता. तसेच, पत्नी माहेरी न आल्यास तिला व तिच्या मुलाला मारून टाकण्याची धमकीही देत होता.
दोन महिन्यांपूर्वी न्यायालयातील तारखेला बारामतीला आले असता ‘मुलाला माझ्याकडे सांभाळण्यास दे, नाही तर तुला मारून टाकतो,’ अशी धमकी दिल्याने कोमल हिच्या आई-वडिलांनी ऋतेशला वडील शिवाजीच्या ताब्यात दिले होते.
रविवारी सकाळी शिवाजी हा मुलगा ऋतेश याला दुचाकीवर बसवून कोमल हिच्या घरी येऊन ‘तू जर आज नांदण्यास आली नाही, तर तुला हा कधीच जिवंत दिसणार नाही,’ असे म्हणत उजनीच्या दिशेने निघून गेला. उजनीच्या जॅकवेलमध्ये मुलाला टाकून दुचाकी पडल्याचा बनाव करीत मुलगा बुडाल्याचे गावातील नागरिकांना त्याने सांगितले.
या वेळी नागरिकांनी मुलाला बाहेर काढून उपचारांसाठी भिगवण येथील खासगी दवाखान्यात आणले मात्र, त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. याबाबत फिर्याद दाखल होताच भिगवण पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केले.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भानुदास पवार, पोलीस हवालदार अनिल सातपुते, विलास मोरे, नवनाथ भागवत हे करीत आहेत.