इन्स्टाची ओळख, बलात्कार, अन् न्युड व्हिडिओ; २१ वर्षीय तरुणीचं सर्वस्व लुटले
By प्रदीप भाकरे | Published: January 22, 2023 07:56 PM2023-01-22T19:56:09+5:302023-01-22T19:56:33+5:30
जुन्या प्रियकराकडून व्हायरल! एक फुल, दो माली; प्रियकरांचा प्रताप, ती गावी परतल्यावर दोघांमध्ये व्हॉटसॲप चॅट व व्हिडिओ कॉलिंग होऊ लागले. आरोपी हर्षल हा नेहमी व्हिडिओ कॉलवर तिच्याशी अश्लील कृती करीत होता.
अमरावती: दुसऱ्या प्रियकरासोबत इन्स्टावर झालेली ओळख बलात्कारापर्यंत पोहोचली तर ते संबंध तोडण्यासाठी पहिल्या प्रियकराने पिडिताचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. पहिल्या प्रियकराने त्याने काढलेले पिडिताचे व्हिडिओ तिच्या दुसऱ्या प्रियकरासह तिला व तिच्या मैत्रिणीला पाठविले. १७ फेब्रुवारी २०२२ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी २१ जानेवारी रोजी रात्री आरोपी हर्षल चंद्रकांत बाभुळकर (२१, रा. रामनगर, वर्धा) व आकाश सिंघाने (रा. अंजनवती, ता. धामणगाव रेल्वे) यांच्याविरूध्द बलात्कार, बदनामी, धमकी तथा आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. यातील हर्षल बाभुळकरने पिडिताचे व्हिडिओ व्हायरल केले. तथा आकाश सिंघाणे याने तिनदा तिचे सर्वस्व लुटले. २१ वर्षीय तरूणी फेब्रुवारी २०२२ मध्ये वर्धा येथे गेली असता, तिची हर्षल बाभुळकर सोबत ओळख झाली. ती गावी परतल्यावर दोघांमध्ये व्हॉटसॲप चॅट व व्हिडिओ कॉलिंग होऊ लागले. आरोपी हर्षल हा नेहमी व्हिडिओ कॉलवर तिच्याशी अश्लील कृती करीत होता. त्यामुळे तरूणीने ऑक्टोबर २०२२ पासून त्याच्यासोबत बोलणे बंद केले व त्याच्या मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला.
तीनदा बळजबरी
दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये त्या तरूणीची आकाश सिंघाणे याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. तेव्हापासून ती त्याच्याशी मोबाईल कनेक्ट होती. २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास आकाशने तिला धामणगाव बस स्टॉपहून तरोडा फाट्यावरील एका शेतात नेले. तिला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोनदा त्याने तिच्यावर बळजबरी केली.
व्हॉट्सॲप हॅक केले
आकाश सिंघाणे याने पिडित तरूणीचे व्हाॅट्सअप हॅक करून हर्षल बाभुळकर याचा संपर्क क्रमांक जाणून घेतला. त्याचेसोबत मोबाईलवर बोलणे सुरू केले. त्यानंतर हर्षल बाभुळकर याने तरूणीला तुझे आकाशशी संबंध आहे, अशी धमकी देऊन तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला धामणगाव येथे भेटण्यात बोलावले. त्यावर पिडिताने नकार दिला असता हर्षलने ते पिडिताचे व्हिडिओ तिच्यासह तिची मैत्रीण व अन्य एकाला पाठवून व्हायरल केले.
आरोपी हर्षलने व्हिडिओ व्हायरल केले, तर आकाश नामक आरोपीने तिच्याशी बळजबरी केली, अशी तक्रार नोंदवून घेण्यात आली. आरोपींचा शोध सुरू आहे. पथक पाठविले आहे - हेमंत चौधरी, ठाणेदार, तळेगाव दशासर