मृताच्या टाळूवरील लाेणी खाण्याचा प्रकार, लाचखोर महिला तलाठ्यासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 09:03 PM2023-04-04T21:03:58+5:302023-04-04T21:04:23+5:30
तक्रारदार यांच्या आईचे जानेवारी महिन्यात निधन झाले होते. त्यांचे ७/१२ उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी त्यांनी चांगळी येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता.
पुणे : मृत्यु पावलेल्या आईचे ७/१२ उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी २ हजारांची लाच घेतला चांबळी गावच्या महिला तलाठ्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तलाठी नीलम मानसिंग देशमुख (वय ३२) व खासगी व्यक्ती नारायण शेंडकर (वय ५०) अशी त्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या आईचे जानेवारी महिन्यात निधन झाले होते. त्यांचे ७/१२ उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी त्यांनी चांगळी येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. नाव कमी करण्यासाठी त्यांच्याकडे २ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या तक्रारीही पडताळणी केली. त्यात नीलम देशमुख यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर चांबळी येथील कार्यालयात सापळा रचला. नीलम देशमुख यांच्या करीता २ हजार रुपयांची लाच घेताना नारायण शेंडकर याला पकडण्यात आले. सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्योती पाटील तपास करत आहेत.