धक्कादायक! नुपूर शर्माला पाठिंबा देणाऱ्या शिंप्याची निर्घृण हत्या, दुकानात घुसून चिरला गळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 07:13 PM2022-06-28T19:13:08+5:302022-06-28T19:29:46+5:30
राजस्थानच्या उदयपूरमध्ये शिंप्याची दुकानात घुसून हत्या करण्यात आली, या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे.
Udaipur Murder Case: राजस्थानच्या उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माला पाठिंबा दिल्यामुळे एका शिंप्याची दुकानात घुसून हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी शिंप्याचा गळा निर्घृणपणे चिरला.
गळा चिरुन हत्या
उदयपूरमधील मालदास स्ट्रीट परिसरात ही भीषण घटना घडली आहे. कन्हैया लाल असे मृत शिंप्याचे नाव आहे. शिंप्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मृत व्यक्तीच्या 8 वर्षीय मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. याचा राग येऊन आरोपींनी शिंप्याची निर्घृण हत्या केली.
Rajasthan | Locals protest after two men behead youth in broad daylight in Udaipur's Maldas street area
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 28, 2022
Shops in Maldas street area have been closed following the incident. pic.twitter.com/ZC113q0iJj
शहरात हत्येचा निषेध
विशेष म्हणजे हत्येची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवली. या क्रूर घटनेच्या विरोधात स्थानिक लोकांनी निदर्शने केली. यावेळी तणावाचे वातावरण पाहता मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात आहे. तसेच, पुढील 24 तास इंटरनेट बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपींनी व्हिडीओ जारी करून हत्येची जबाबदारीही स्वीकारल्याने, मारेकऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी होत आहे.
मैं सभी से अपील करता हूं कि इस घटना का वीडियो शेयर कर माहौल खराब करने का प्रयास ना करें। वीडियो शेयर करने से अपराधी का समाज में घृणा फैलाने का उद्देश्य सफल होगा।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 28, 2022
मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन
या घटनेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, 'उदयपूरमधील तरुणाच्या निर्घृण हत्येचा निषेध. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल. पोलिस गुन्ह्याचा योग्य तपास करत आहेत. मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अशा जघन्य गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.'
भाजपचा गेहलोत सरकारवर निशाणा
भाजप नेते राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विट करत गेहलोत सरकारवर निशाणा साधला. 'उदयपूरमधील या घृणास्पद घटनेला गेहलोत सरकार जबाबदार आहे. या सरकारने करौली दंगलीच्या मुख्य दंगलखोराला मोकळे सोडले. टोंकमध्ये मौलानाने हिंदूंचे गळे कापण्याची धमकी दिली होती, त्यावर कारवाई झाली नाही. हा मारेकरी व्हिडिओ बनवून हत्याकांडाच्या धमक्याही देत राहिला, पण सरकार गप्प बसले,' असे ते म्हणाले.
दुसरीकडे, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले की, 'दोन मुस्लिमांनी उदयपूरमधील हिंदू दुकानदार कन्हैया लालची त्याच्या दुकानात हत्या केली. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून याची जबाबदारीही घेतली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना शस्त्रे दाखवून धमकीही दिली आहे. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत गप्प आहेत,' असे म्हटले.