ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 08:58 AM2024-10-03T08:58:42+5:302024-10-03T09:08:20+5:30
तालुकाउपप्रमुख वडवळे यांना एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये टाकून अज्ञातस्थळी नेऊन जबर मारहाण केली.
नांदेड - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यात सोशल मीडियातून राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना डिवचण्याचं काम करत असतात. मात्र यातूनच एका कार्यकर्त्यांसोबत जीवघेणा प्रकार घडला आहे. उद्धवसेनेच्या लोहा तालुका उपप्रमुखास अज्ञातस्थळी नेऊन जबर मारहाण केली आणि अपघात झाल्याचा बनाव करत नांदेडच्या रुग्णालयात भरती केले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. परंतु, या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
उद्धवसेनेचे लोहा तालुका उपप्रमुख संतोष एकनाथ वडवळे (वय ३९, रा. कापसी बुद्रुक, ता. लोहा) हे दि.१ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी काही कामानिमित्त नांदेडला आले होते. त्यांच्यासोबत असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी वैजाळे यांना फोन करून संतोष यांना सोबत घेऊन या. थोडे काम आहे, आम्ही काकांडी शिवारातील एका ढाब्यावर थांबलो आहोत, असे कळविण्यात आले. त्यामुळे वैजाळे हे संतोष वडवळे यांना घेऊन रात्री आठ वाजेच्या सुमारास काकांडी शिवारात पोहोचले.
यावेळी १० ते १२ जणांच्या टोळक्याने प्रारंभी संतोष वडवळे यांना तू पक्षाची बाजू फेसबुकवर काय टाकत आहेस? असा जाब विचारत मारहाण केली. तसेच वैजाळे यांना मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला व तेथून त्यांना हाकलून लावल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तालुकाउपप्रमुख वडवळे यांना एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये टाकून अज्ञातस्थळी नेऊन जबर मारहाण केली. चिखलीकरांविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्यामुळे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रभारी ठाणेदार ओमकांत चिंचोलकर यांनी सांगितले.
धारदार शस्त्राने बोटे छाटले
वडवळे यांना लाठ्या-काठ्यांसह धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यात आले. वडवळे यांचे तीक्ष्ण हत्याराने बोटे छाटण्यात आले. तसेच त्यांना जखमी अवस्थेत नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात भरती केले. तद्नंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.