अब्जाधीश व्यक्तीच्या हत्येचा खळबळजनक खुलासा, गर्लफ्रेन्डच्या मुलानेच केली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 05:44 PM2021-10-12T17:44:36+5:302021-10-12T17:46:28+5:30
UK Crime News : सटन यांचा मृतदेह त्यांच्या २० कोटी रूपयांपेक्षा महागड्या बंगल्यात सापडला होता. त्यांची कुणीतरी चाकूने वार करत हत्या केली होती.
ब्रिटनमधील (UK) सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक सर रिचर्ड सटनच्या (sir Richard Sutton) हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. रिचर्ड सटनची हत्या करणारा दुसरा-तिसरा कुणी नसून त्याच्या गर्लफ्रेन्डचा मुलगाच आहे. या मुलानेच हॉटेल टायकून सटनच्या (Sir Richard Sutton Murder Case) हत्येप्रकरणात आपला गुन्हा कबूल केला आहे.
'द सन यूके'च्या वृत्तानुसार, यावर्षी ७ एप्रिलला ८४ वर्षीय सर रिचर्ड सटन यांची हत्या करण्यात आली होती. सटन यांचा मृतदेह त्यांच्या २० कोटी रूपयांपेक्षा महागड्या बंगल्यात सापडला होता. त्यांची कुणीतरी चाकूने वार करत हत्या केली होती. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हे सिद्ध झालं होतं की, सटनच्या छातीवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते.
याप्रकरणी रिचर्ड सटनच्या प्रेयसीच्या ३४ वर्षीय मुलगा थॉमस श्रायबरला ताब्यात घेतलं. सुरूवातीला थॉमसने त्याचा या हत्या प्रकरणात काहीच हात नसल्याचं सांगितलं होतं. त्याच्यावर आपली आई म्हणजे रिचर्ड सटनची प्रेयसीवरही जीवघेणा हल्ला करण्याचा आरोप आहे.
चौकशीतून समोर आलं की, तो हत्येच्या दिवशी घटनास्थळी उपस्थित होता. पुराव्यांचा आधारावर जेव्हा त्याला हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं तेव्हा तो त्याचा गुन्हा मान्य केला. त्याने हेही सांगितलं की, त्याच्याकडून चुकून हे कृत्य झालं. त्याने हे ठरवून केलं नाही.
दरम्यान, सर रिचर्ड सटन ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. त्यांचे हॉटेल्स देशभरात होते. त्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी आणि फार्म हाऊस होते. त्यांच्याकडे कोट्यावधी रूपयांची संपत्ती होती. त्यामुळे हा वाद झाल्याचं बोलंलं जात आहे. कारण रिचर्ड सटनला पत्नीकडून दोन मुले होते. २०२० मध्ये त्यांची एकूण संपत्ती ३० अब्ज रूपयांपेक्षा अधिक होती.