उल्हासनगरच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार: आरोपी अवघ्या २४ तासात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 12:03 AM2020-10-24T00:03:11+5:302020-10-24T00:13:26+5:30
पूर्ववैमनस्यातून उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करीत त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या हितेश ठाकूर आणि सागर किरण शिंदे या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिक येथून शुक्रवारी अटक केली. त्यांनी गुरुवारी संदीप यांच्यावर खूनी हल्ला केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करीत डोक्यावर हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणा-या हितेश गुलबीर ठाकूर (२३) आणि सागर किरण शिंदे (२३) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अवघ्या २४ तासांमध्ये नाशिक येथून शुक्रवारी अटक केली. या दोघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची कबूली हितेश आणि सागर या दोघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही उल्हासनगर येथील रहिवाशी आहेत. २२ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर मधील श्रीराम चौकातील एका बार मधून संदीप आणि त्याचा मित्र जहागीर मोरे हे दोघेही बाहेर पडले. त्यानंतर ते त्याठिकाणी रस्त्यावर गप्पा मारीत उभे होते. त्याचवेळी एका कारमधून आलेल्या हितेश आणि सागर या दोघांनी संदीप गायकवाड यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करीत गावठी रिव्हॉल्व्हरमधून तीन राउंड फायर केले. यात संदीप हा गंभीर जखमी झाला. यावेळी गस्तीवरील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपींच्या वाहनाचा पाठलाग केला. हा पाठलाग करीत असताना, त्यांच्या करला पोलिसांनी पाठीमागून ठोकर दिली असता, हल्लेखोर कार सोडून रेल्वेमार्ग पार करुन पसार झाले. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने या दोन्ही आरोपीना नाशिक येथून शुक्रवारी अटक केली. पूर्ववैमनस्यातून तसेच गुन्ह्यातील आरोपी हितेश यास मारण्याची सुपारी दिल्याच्या रागातून हा हल्ला केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.