उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसच संशयाच्या फेऱ्यात; गेल्या दोन महिन्यांपासून युवराज भदाणे फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 08:30 PM2022-04-20T20:30:49+5:302022-04-20T20:31:01+5:30
उल्हासनगर महापालिकेत जनसंपर्क अधिकाऱ्यांची नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा ठपका नियुक्त केलेल्या चौकशी समितीने ठेवला.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फसवणूक तर नवीमुंबई तुर्भे पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला उल्हासनगर महापालिकेचा निलंबित जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे गेल्या दोन महिन्यांपासून फरार आहे. याप्रकरणी मध्यवर्ती व तुर्भे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून तपास सीआयडीकडे देण्याची मागणी शहरातून होत आहे.
उल्हासनगर महापालिकेत जनसंपर्क अधिकाऱ्यांची नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा ठपका नियुक्त केलेल्या चौकशी समितीने ठेवला. याप्रकरणी युवराज भदाणे यांच्यावर २१ फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान नवीमुंबई येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात उल्हासनगरातील एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा भदाणे यांच्यावर दाखल झाला. तेंव्हा पासून भदाणे फरार आहे. दरम्यान दोन्ही गुन्ह्यात भदाणे याचा अटक पूर्व जामीन अर्ज ठाणे व कल्याण न्यायालयात अर्ज फेटाळल्याने, त्याच्यावर अटकेची टांगती तलवार लटकलेली आहे. गुन्हा दाखल होऊन दोन महिने उलटल्यानंतरही मध्यवर्ती व नवीमुंबई येथील तुर्भे एपीएमसी पोलीस भदाणे याचा शोध घेण्यास अपयशी ठरले. भदाणे याचा तपास त्यांच्याकडून सीआयडी अथवा सीबीआय यांच्याकडे देण्याची मागणी शहरातून होत आहे. तर दुसरीकडे भदाणे याच्यावर जिल्हास्तरीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याने, पोलीस अटक करीत नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
भदाणे प्रकरण उजेडात आणणारे समाजसेवक व जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी भदाणे यांचा तपास शहर गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याची मागणी पोलीस उपायुक्त यांच्याकडे लावून धरली आहे. महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी भदाणे प्रकरणी योग्य तपास करून बनावट कागदपत्रांचे बिंग उघड केले. मात्र त्यांना पोलिसांची योग्य साथ मिळत नसल्याची भावना शहरात निर्माण झाली. महापालिकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवून १ कोटी ३३ लाखाची रिकव्हरी काढली आहे.
स्थानिक नेते व पोलिसांचे अभय?
महापालिकेचा वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होऊन दोन महिने उलटले. मात्र भदाणे पोलिसांना मिळून आला नसल्याने, पोलीस तपासावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. स्थानिक नेते व पोलिस मेहेरबान असल्यानेच भदाणे फरार असल्याचा आरोप दिलीप मालवणकर यांनी केला.