उल्हासनगर प्रांत अधिकाऱ्याला गाडीसह जाळून टाकण्याची धमकी, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 07:56 PM2020-11-27T19:56:44+5:302020-11-27T19:57:11+5:30
Crime News : धमकीची दखल घेत प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी गुरुवारी रात्री मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून दीपक सूर्यवंशी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
उल्हासनगर : प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांना गाडीसह जाळून टाकण्याची धमकी फेसबुकवर टाकल्या प्रकरणी दीपक सूर्यवंशी याच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दोन दिवसापूर्वी प्रांत अधिकाऱ्यांची गाडी तोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला योगीराज देशमुख हा दीपक सूर्यवंशी याचा मामा असून रागाच्या भरात हे कृत्य केले आहे.
उल्हासनगर प्रांत कार्यालय नेहमी वादात राहिले असून मनसेचे विभाग प्रमुख योगीराज देशमुख यांनी शासनाच्या आरक्षित भूखंडावरील अवैध बांधकामाच्या तक्रारीची दखल घेतली नाही. या रागातून प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीची तोडफोड या आठवड्यात केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी देशमुख याला अटक केली. हे वादळ संपत नाही, तोच गुरुवारी दीपक सूर्यवंशी याने फेसबुकवर योगीराज देशमुख याच उल्लेख करून जिथे विषय गंभीर तेथे आपला मामाच खंबीर. अशी पोस्ट टाकून प्रांत अधिकारी यांना गाडी सोबत जाळून टाकू. अशी धमकीवजा पोस्ट टाकली. फेसबुकवरील धमकीची दखल घेत प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी गुरुवारी रात्री मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून दीपक सूर्यवंशी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.
प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे याना फेसबूकवर गाडीसह जिवेठार मारण्याची धमकी देणारा दीपक सूर्यवंशी मनसेचा पदाधिकारी व कार्यकर्ता नसल्याची प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली. या प्रकाराने प्रांत कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले असून प्रांत अधिकारी गिरासे यांच्या कालावधीत खुले भूखंड, विविध शासकीय कार्यालयाच्या जागा आदीला सनद दिल्याची माहीत सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.