हातातील रिव्हॉल्वर खाली पडून गोळी फायर; सेवल साळवी जखमी
By सदानंद नाईक | Updated: July 14, 2023 18:20 IST2023-07-14T18:19:39+5:302023-07-14T18:20:07+5:30
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाजीमलंग परिसरातील काकडगाव येथे सेवल गजानन साळवी हे कुटुंबासह राहतात.

हातातील रिव्हॉल्वर खाली पडून गोळी फायर; सेवल साळवी जखमी
सदानंद नाईक
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकडगाव मध्ये राहणाऱ्या सेवल साळवी यांच्या रिव्हॉल्वरमधून गोळी फायर होऊन ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी त्यांच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाजीमलंग परिसरातील काकडगाव येथे सेवल गजानन साळवी हे कुटुंबासह राहतात. बुधवारी नेहमीप्रमाणे साळवी हे घरात कपडे काढत असताना, त्यांच्या कमरेला लावलेली मात्र सेफ्टी लॉक न केलेली रिव्हॉल्वर खाली फरशीवर पडली. रिव्हॉल्वर खाली पडताच गोळी फायर होऊन त्यांच्या मांडीच्या पाश्र्वभागाला लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन नगरे यांच्या तक्रारीवरून जखमी सेवल साळवी यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस अधिक तपास करीत आहेत.