उमेश कोल्हे खून प्रकरण: 'एनआयए'कडून दहाव्या आरोपीला अटक
By प्रदीप भाकरे | Published: August 12, 2022 11:56 PM2022-08-12T23:56:39+5:302022-08-12T23:57:18+5:30
Umesh Kolhe murder case: अमरावती येथील व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 'एनआयए'कडून १२ ऑगस्ट रोजी दहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अमरावती : येथील व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 'एनआयए'कडून १२ ऑगस्ट रोजी दहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शेख शकील शेख छोटू (२८, रा. इमामनगर, लालखडी, अमरावती) असे 'एनआयए'ने शुक्रवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास २ जुलै २०२२ पासून 'एनआयए' करत आहे. दरम्यान 'एनआयए'कडून आठ दिवसांपूर्वी उमेश कोल्हे यांच्या खून प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती. त्यामुळे आता एकूण आरोपींची संख्या दहा झाली आहे. शुक्रवारी अटक केलेला आरोपी हा उमेश कोल्हे खून प्रकरणातील इतर आरोपींसोबत कटात सहभागी असल्याचे 'एनआयए'कडून सांगितले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेख इरफान याच्यासह इतरांचा सहभाग होता. मात्र प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकरणाचा तपास एनआयएकडून करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालायाने घेतला आणि तपास एनआयएकडे वर्ग केला होता.