अधिकाऱ्याकडे सापडली बेहिशेबी मालमत्ता, गोव्यात सीबीआयची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 14:27 IST2023-05-19T14:27:06+5:302023-05-19T14:27:29+5:30
उपलब्ध माहितीनुसार, २०१६ ते २०२३ या कालावधीमध्ये या अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळी केल्याचे दिसून आले.

अधिकाऱ्याकडे सापडली बेहिशेबी मालमत्ता, गोव्यात सीबीआयची कारवाई
मुंबई : महालेखापाल कार्यालयात सहायक लेखा अधिकारी पदावर गोवा येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे एक कोटीपेक्षा जास्त मूल्याची संपत्ती सापडली आहे. या अधिकाऱ्याने नाव जॉर्ज वर्गिस असे आहे.
उपलब्ध माहितीनुसार, २०१६ ते २०२३ या कालावधीमध्ये या अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळी केल्याचे दिसून आले. २०१६ पूर्वीपर्यंत त्याच्या संपत्तीचा तपास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केला असता त्याच्या मालकीचे केरळ येथे एक दुकान असल्याचे दिसून आले. मात्र, २०१६ ते २०२३ या कालावधीमधील त्याच्या मालमत्तेची तपासणी केली असता त्याच्याकडे गोव्यात एक ५० लाख रुपये किमतीचा बंगला, केरळात एक दुकान, केरळमध्येच २५ लाख रुपये किमतीची एक कृषी जमीन, १३ लाख रुपये किमतीची ऑडी, एक आय-२० गाडी, २ लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी आदी गोष्टी त्याच्याकडे आढळून आल्या.
सात वर्षांत त्याचे उत्पन्न, ठेवी आदींच्या माध्यमातून १ कोटी २१ लाखांचे व्यवहार झाल्याचे दिसून येते. याच कालावधीत त्याचा खर्च ७४ लाख ७६ हजार होता. उत्पन्नाखेरीज त्याने ४७ लाख रुपयांचे अतिरिक्त व्यवहार केल्याचे दिसून आले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.