वाळूज येथे गुंगी आणि नशा आणणाऱ्या औषधांचा बेकायदा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 06:12 PM2018-09-03T18:12:55+5:302018-09-03T18:13:45+5:30
आरोपीकडून तीन धारदार तलवारी आणि सुमारे २८ हजार ८९६ रुपयांची विविध कंपन्यांच्या औषधी गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला.
औरंगाबाद : गुंगी आणि नशा आणणाऱ्या औषधांचा बेकायदा साठा आणि तलवारीसह एका जणाला दहशतवाद विरोधी सेल आणि अन्न व प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करून अटक केली. आरोपीकडून तीन धारदार तलवारी आणि सुमारे २८ हजार ८९६ रुपयांची विविध कंपन्यांच्या औषधी गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
सय्यद नबी उर्फ सय्यद लाल(३२,रा.भारतनगर, रांजणगाव शेणपुंजी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भारतनगर येथील रहिवासी सय्यद नबी उर्फ सय्यद लाल हा गुंगी आणि नशेच्या गोळ्या बेकायदेशीर विक्री करतो.त्याच्याकडे या गोळ्यांच्या साठा असल्याची माहिती खबऱ्याने दहशतवाद विरोधी सेलचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंता भापकर, यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक धोंडे, उपनिरीक्षक रेश्मा सौदागर, सहायक उपनिरीक्षक गोरख चव्हाण, युनूस पठाण,गौतम गंगावणे, दीपक इंगळे चालक अंबादास दौड यांनी औषधी निरीक्षक वर्षा प्रवीण महाजन आणि राजगोपाल बजाज यांना सोबत घेऊन सोमवारी सकाळी आरोपीच्या घरावर छापा मारला.
यावेळी त्याच्या घरातील लोखंडी पेटीत अल्प्राकॅन नावाच्या २हजार ७०० गोळ्या, स्पास्मो-ए होन प्लस कॅप्सूलचे २६ बॉक्स ज्यात ३ हजार ७४४ गोळ्या, स्पास्मो प्रॉक्स होन प्लस नावाच्या ४८० कॅप्सूल गोळ्या, स्पास्मो-प्रॉक्सहोन प्लस कॅप्सूल चे रिकामे ६ बॉक्स असा सुमारे २८ हजार ८९६ रुपयांचा औषधी साठा मिळाला. यासोबतच आरोपीच्या घरझडतीत २ फुट ९ इंच लांबीची धारदार तलवार, २ फुट ५ इंचची दुसरी धारदार तलवार आणि १ फुट ९ इंच लांबीची अन्य एक तलवार अशा सुमारे तीन तलवारी आढळल्या.