IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 05:22 PM2020-08-10T17:22:52+5:302020-08-10T17:26:47+5:30
दरवर्षी जून अखेरपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्या अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या बदल्या केल्या जातात.
नरेश डोंगरे
नागपूर : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. तो कधी होणार, तेदेखील स्पष्ट नाही. त्यामुळे बदलीची आस लावून बसलेल्या अधिकाऱ्यांमधील अस्वस्थता तीव्र झाली आहे.
दरवर्षी जून अखेरपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्या अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या बदल्या केल्या जातात. यावर्षी मात्र कोरोनाने सर्वच विस्कळीत करून टाकले. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही विषय मागे पडला. दरम्यान, लॉक डाउन शिथिल करण्यात आल्यानंतर जुलै महिन्यात बदल्यांचे वारे वाहू लागले. 'बिगिनिंग अगेन'मुळे हे वारे आणखीच गतिमान झाले. मात्र बदलीच्या निर्णयाच्या संबंधाने रोजचा दिवस सारखाच निघत असल्याने बदलीसाठी उत्सुक असलेल्या आयपीएस अधिकार्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अनेक पोलिस अधिकारी ती खासगीत बोलूनही दाखवत आहेत. शीर्षस्थ पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनुसार, १ ऑगस्ट पासून बदल्यांची यादी तयार झाली आहे. मात्र, एकमत न झाल्यामुळे ती तशीच पडून आहे. प्रारंभी अयोध्येतील राम जन्मभूमि पूजनाचा सोहळा झाल्यानंतर यादी निश्चित करून बदल्या जाहीर करण्याचे ठरले होते. त्यामुळे ६ ऑगस्ट पासून बदलीच्या तयारीत असलेल्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी आपली तयारी करून ठेवली आहे. आज होणार, उद्या बदली होणार, असे निरोप मिळत असल्याने अनेक जण फोनोफ्रेंड करून एकमेकांकडे विचारणा करीत आहेत. अनेक शिर्षस्थ अधिकारी आपल्या सहकाऱ्यांना दिलासा देत आहेत. मात्र, शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संबंधाने बोलताना १५ ऑगस्टच्या आत बदल्या होईल असे सांगितले. हे सांगताना सगळा विचार विमर्श करून बदलिबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगून अद्याप आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत काही निश्चित झाले नाही, असेही संकेत दिले आहे.
बंदोबस्ताचे काय ?
१५ ऑगस्टचा बंदोबस्त आणि नंतर सुरू होणारा गणेशोत्सव बंदोबस्त बदली झालेल्या नव्या अधिकाऱ्यांना सूट होईल का, अशी शंका घेतल्यामुळे त्यांनी यावर काही बोलण्याचे टाळले. यावरून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत अजुनही अनिश्चितता असल्याचे स्पष्ट झाले आहे. किमान एक आठवडा तरी बदल्या होणार नाही, असेही आता वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलू लागले आहेत.
नागपुरातील पाच अधिकारी बदलणार
बदलीची यादी जाहीर आल्यास कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या मुद्द्यावर नागपुरातील पोलीस आयुक्तांसह किमान पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. दुसरीकडे शहरातील क्राईम रेट कमी केल्यामुळे पोलीस आयुक्तांना आणखी काही महिने येथेच ठेवले जाऊ शकते, असेही मत काही अधिकारी मांडत आहेत.
बदल्याबाबतची पूर्व प्रक्रिया झाली आहे. थोडी फार जी आहे, त्यावर निर्णय घेऊन लवकरच बदल्या केल्या जातील. - अनिल देशमुख, गृहमंत्री
अन्य महत्वाच्या बातम्या...
६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार