मामानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कर्जतमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:03 AM2022-05-31T07:03:46+5:302022-05-31T07:03:53+5:30
ही अल्पवयीन मुलगी वेणगाव येथील वीटभट्टीवर आपल्या कुटुंबासह गेली होती.
कर्जत : पोटल आंबेवाडी येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व त्यातून गर्भवती राहिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अल्पवयीन मुलगी वेणगाव येथील वीटभट्टीवर आपल्या कुटुंबासह गेली होती.
नोव्हेंबर २०२१ ते २६ मे २०२२ या कालावधीत त्या अल्पवयीन मुलीचे कुटुंब पोटल आंबेवाडी येथून वेणगाव येथे वीटभट्टीवर कामासाठी गेले होते. वेणगाव येथे गेल्यानंतर नात्याने मामा असलेल्या विवाहित तरुणाने सहा महिन्यांच्या कालावधीत अल्पवयीन मुलीबरोबर वीटभट्टीवरील झोपडीमध्ये बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. वारंवार असा अत्याचार करीत असताना त्या तरुणाच्या संबंधामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.
या प्रकारची शंका आरोपीच्या पत्नीला आली होती. त्यामुळे त्यांनी त्या प्रकाराबद्दल आपल्या नवऱ्याला विचारले असता त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु, १२ वर्षीय मुलीच्या आईला ही माहिती मिळताच तिने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.