जागेत मुरूम टाकण्याच्या वादावरून काकाने केली पुतण्याची हत्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 04:28 PM2020-06-06T16:28:10+5:302020-06-06T16:31:43+5:30
काकाने पत्नी व मुलाच्या मदतीने सख्ख्या पुतण्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील महागाव येथे ६ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : जागेच्या कारणावरून काकाने पत्नी व मुलाच्या मदतीने सख्ख्या पुतण्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील महागाव येथे ६ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी ६ जून रोजी तीन आरोपीस अटक केली असून, त्यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. गजानन बाबूलाल ठोकळ (२३) असे मृतकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ग्राम महागाव येथील बाबूलाल ठोकळ व पंडितराव ठोकळ या दोन सख्या भावात घराशेजारच्या जागेत मुरूम टाकण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन प्रफुल पंडित ठोकळ (२३), कामिनी पंडित ठोकळ (५०) व पंडित ठोकळ (५५) या तिघांनी गजानन बाबूलाल ठोकळ याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये गजाननचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाची आई मनकर्णा बाबुलाल ठोकळ यांनी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रफुल पंडित ठोकळ, कामिनी पंडित ठोकळ व पंडित ठोकळ या तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३०७, ५२३, ३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार डिगाबर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश शेबडे करीत आहेत.