काकाने केली पुतण्याची हत्या; शेतीवरून झालेला वाद जीवावर बेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:22 PM2021-05-07T18:22:37+5:302021-05-07T18:23:38+5:30
Murder Case : रामपूर (मांढेसर)ची घटना : सात जणांना अटक
भंडारा : शेतीच्या हिस्सेवाटणीवरून झालेल्या वादात काकाने पुतण्याचा खून केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील रामपूर (मांढेसर) येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता घडली. काठीने जोरदार प्रहार केल्याने पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी काकासह सात जणांना अटक केली आहे.
रवींद्र श्यामराव सव्वालाखे (३८) रा. रामपूर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी शोभेलाल उपासू सव्वालाखे (५७), शिवा उपासू सव्वालाखे (५५), बाबुलाल उपासू सव्वालाखे (५३), गेंदलाल जलकन सव्वालाखे (३८), दुर्गाप्रसाद शिवा सव्वालाखे (२३), बळीराम बाबुलाल सव्वालाखे (२१), विनोद जलकन सव्वालाखे (३५) सर्व रा. रामपूर (मांढेसर) अशी आरोपींची नावे आहेत. मांढेसर येथील सव्वालाखे कुटुंबात शेतीचे हिस्सेवाटणी काही दिवसापुर्वी करण्यात आली होती. परंतु झालेल्या वाटणीवरून कुटुंबात धुसपूस सुरू होती. त्यातच जागेचा वाद सुरू होता.
शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता रवींद्र सव्वालाखे आपल्या शेतात गेला होता. त्यावेळी याच कारणावरून वाद झाला. या वादात सात जण हातात लाठ्या काठ्या घेवून आलेत. त्यांनी रवींद्रच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. त्यात तो जागीच गतप्राण झाला. भांडणाचा आवाज ऐकून रवींद्रचा लहान भाऊ देवेंद्र धावत आला. त्यावेळी त्याच्या मागेही हातात काठ्या व तलवार घेवून मारायला धावले. त्यात तो किरकोळ जखमी झाला. जीव वाचून तेथून पळून गेला.
या घटनेची माहिती गावात होताच एकच खळबळ उडाली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार राहूल देशपांडे, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलीस हवालदार सोमेश्वर सेलोकर, मिथून चांदेवार, पवन राऊत, दुर्योधन भुरे, सागर भांडे यांनी घटना स्थही धाव घेतली. देवेंद्र सव्वालाखे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३०२, ३२४, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलीस कायदा १३५, भारतीय हत्यार कायदा कलम चार, २५ नुसार गुन्हा दाखल केला. अवघ्या काही तासातच सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली.