प्रियकरासोबत पलायन केलेल्या भाचीला १९ महिन्यांनी पाहून मामा ढसाढसा रडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 04:25 PM2020-12-11T16:25:06+5:302020-12-11T16:25:31+5:30
Crime News : तीन महिन्यापासून शहरात वास्तव्य : पोलीस व नातेवाईकांनी ठेवले होते बक्षीस
जळगाव - प्रेमप्रकरणातून प्रियकरासोबत नागपूर येथून पलायन केलेल्या १९ महिन्यानंतर सापडलेल्या भाचीला पाहून मामा ढसाढसा रडला तर ज्या पोलिसांमुळे भाचीचा शोध लागला, त्या पोलिसांसमोरही आभाराला शब्द नाहीत असे म्हणत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. भाचीची अवस्था व मामाची तळमळ पाहता तपास कामातील पोलिसांनाही गहिवरुन आले. हा प्रसंग शुक्रवारी सकाळी कालिंका माता मंदिर परिसर व स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात घडला. या प्रेमीयुगुलाला घेऊन नागपूर पोलीस व मामा परतीच्या प्रवासाला निघाले.
या घटनेबाबत माहिती अशी की, नागपूर येथील २० वर्षीय तरुण व २० वर्षीय तरुणी यांनी प्रेमप्रकरणातून २० मे २०१९ रोजी घरातून पलायन केले. दोघांबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. अधिकच्या चौकशीत दोघही पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असून ११ पासून एकाच ठिकाणी शिकवणीला असताना दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरु झाले. दोघंही वेगवेगळ्या समाजाचे असल्याने लग्नाला विरोध होऊ शकतो, या शक्यतेने घरातून पलायन केल्याचे उघड झाले. स्थानिक पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी केली, मात्र त्यात त्यांना अपयश आले होते. तरुणीची आई व मामांनी तत्कालिन पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली, आईची अवस्था पाहता उपाध्याय यांनी पुन्हा यंत्रणा कामाला लावली, परंतु तेव्हाही अपयश आले. शेवटी या दोघांची माहिती देणाऱ्याला पाच हजाराचे बक्षीस दिले जाईल, असे पोलिसांना जाहीर करावे लागले. दीड वर्ष झाले तरी शोध लागत नसल्याने तरुणीच्या आईची प्रकृती खालावली. काही अनुचित घटना तर घडली नसावी ना? असा प्रश्न घोंगावत होता.
दर महिन्याला बदलवले घर
हे प्रेमीयुगुल तीन महिन्यापासून कालिंका माता मंदिर परिसरात वास्तव्याला होते. त्याआधी ते हिंगाणा, ता. यावल येथे वास्तव्याला होते. दर महिन्याला घर बदल करीत असल्याने त्यांच्याविषयी रहिवाशांना शंका आली. त्यांच्यातील एका जणाने थेट स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती दिली. याची खातरजमा करण्यासाठी बकाले यांनी हवालदार शरद भालेराव व नरेंद्र वारुळे यांना पाठविले असता त्यात तथ्य आढळून आले. गोपनीय माहिती काढून त्यांच्याविषयी नागपूर पोलिसात काही गुन्हा दाखल आहे का? याची चौकशी केली असता हुळकेश्वर पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची नोंद असून तिच्या शोधासाठी पोलिसांनी बक्षिस जाहिर केल्याची माहिती प्राप्त झाली. मुलगा, मुलगी जळगावात असल्याचे समजताच तेथील हवालदार नथ्थू ढोबळे, महिला कर्मचारी अनिता धुर्वे व मुलीचा मामा असे गुरुवारी रात्री जळगावकडे निघाले.
घर पाहून मामा हतबल..
या घटनेतील तरुणीचा मामा महावितरण कंपनीत वर्ग १ चा अधिकारी आहे. शुक्रवारी सकाळी कालिंका माता चौक परिसरात भाचीचे घर पाहून तो जागेवरच हतबल झाला.तरुणीच्या वडीलांचे निधन झालेले आहे, तिच्या आईची अवस्था पाहता मामा भाचीला पाहून ढसाढसा रडू लागला. स्थानिक पोलिसांनी दोघांना शनी पेठ पोलीस ठाण्यात नेले. तेथे नोंद करुन त्यांचा ताबा घेतला. तेथून हे सर्व जण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बकाले यांच्याकडे आले. तुमच्यामुळे माझी भाजी सुखरुप मिळाली असे म्हणत मामाने हुंदके देत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. दरम्यान, सकाळी ९ वाजता प्रेमीयुगुलाला घेऊन पोलीस नागपूरला रवाना झाले.